तुळजापूरला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा अपघात; चार भाविक जागीच ठार

तरुण भारत लाईव्ह । २३ ऑगस्ट २०२३। नगरहून तुळजापूरला दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या गाडीला सोलापूर जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.  या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहोळ तालुक्यातील यावली गावाजवळ हा अपघात झाला.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यातील रांझणगाव येथील दहा  जण मारुती इको कारने तुळजापूरला दर्शनासाठी जात होते. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील यावली गावाजवळ येताच भाविकांच्या गाडीला मालट्रकने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. अन्य सहा जणांची प्रकृतीही चिंताजनक आहे.

आदम अली शेख, हिराबाई रामदास पवार, कमलाबाई मारुती वेताळ, द्वारकाबाई नागनाथ गायकवाड अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. तर बाई बाबू पवार, छकुली भीमा पवार, सई योगीराज पवार, मंदाबाई नाथा पवार, सुरेखा भारत पवार आणि बायजाबाई रामदास पवार अशी जखमींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.