उपवनसंरक्षक कार्यालयातील लेखापाल लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

धुळे : शेतातील लागवडीचे तोडलेल्या सागाच्या १०० झाडांच्या लाकडाच्या ९७ नगांची वाहतूक करायची होती. यासाठी परवानगी देण्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे वन विभाग उपवनसंरक्षक कार्यालयातील लेखापाल किरण गरीबदास अहिरे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडत अटक केली.

तक्रारदार हे बहाळ (रथाचे) ता. चाळीसगाव येथील रहिवासी आहेत. त्यांचा लाकूड वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांना गरताड (ता.धुळे) येथील शेतकऱ्याच्या शेतात लागवड केलेल्या व तोडलेल्या सागाच्या लाकडांची वाहतूक करावयाची होती. शेतकऱ्याने वाहतुकीसाठी परवानगी मिळावी, यासाठी २१ फेब्रुवारी व २३ फेब्रुवारी रोजी वन क्षेत्रपाल धुळे (ग्रामीण) यांच्याकडे अर्ज केला होता. ही परवानगी मिळण्याकामी कार्यालयातील लेखापाल किरण अहिरे यांनी लाकूड वाहतुकीच्या परवानगीचे काम करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यासंदर्भात १० जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयाकडे तक्रार केली होती. यासंदर्भात गुरुवार, ११ रोजी पडताळणी केली असता लेखापाल किरण अहिरे यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही कारवाई एसीबी धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी यांच्या पथकातील राजन कदम, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, जगदीश बडगुजर यांनी केली. या कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले.