---Advertisement---
शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ जानेवारीत मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती. माजी नगरसेवक बाळू मोरे खून प्रकरणातील संशयित आरोपी सुमित भोसले याच्या घरासमोर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा गोळीबार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता.
या प्रकरणातील आरोपी स्वप्नील उर्फ गोलू धर्मराज ठाकूर (२१, रा. तुकाराम वाडी, जळगाव) यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यावेळी पोलिसांच्या चौकशीअंती संशयित अंकित बाळू मोरे याच्याकडून पिस्तूल, तर संकेत बाळू मोरे याच्या घरातून कोयता, गुप्ती आणि जिवंत काडतूस असे घातक शस्त्रे मिळून आले होते. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात दोघांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात भाजपचे चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांची हत्या करण्यात आली होती. सुमित भोसले यांच्या घरासमोरील गोळीबाराचे बाळू मोरे यांच्या हत्येशी कनेक्शन असल्याचे बोलले जात होते.
तत्कालीन पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी टोळीने गुन्हे करणारा टोळीप्रमुख स्वप्नील उर्फ गोलू यास इतर साथीदारांसह जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांमधील भीतीचे सावट लक्षात घेता जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी या आधीच तडीपार केले होते.
स्वप्नील उर्फ गोलू ठाकूर विरोधात विविध पोलीस ठाण्यात दरोडा, गंभीर दुखापत, घातक हत्यारे बाळगणे, घातक हत्याराने दुखापत करणे, गोळीबार, दहशत पसरवणे अशा आशयाचे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. हा आरोपी जिल्ह्यातून तडीपार असताना चाळीसगावच्या गोळीबार घटनेत कसा असू शकतो या पार्श्वभूमीवर औरंगाबाद खंडपीठात स्वप्नील उर्फ गोली ठाकूर याच्या वतीने ॲड. भूषण महाजन यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता आरोपीस जमीन मंजूर केला आहे.