लॉकअप तोडून पळालेल्या आरोपीस मध्यप्रदेशात अटक

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२२ । नवापूर येथे लॉकअप तोडून फरार झालेल्या आरोपीतांपैकी दुसर्‍या आरोपीला मध्यप्रदेशातील खरगोन येथून अटक करण्यात आली आहे. यापुर्वी गुजरात पोलीसांनी एका आरोपीस उच्छल येथून ताब्यात घेतले होते. तीन आरोपी अद्यापही फरार आहेत.

नवापूर तालुक्यातील नवरंग गेटजवळ दि.५ डिसेंबर २०२२ रोजी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास कोठडा शिवारातील एमआयडीसीकडे जाणार्‍या रस्त्यावर हैदर उर्फ इस्त्राईल इस्माईल पठाण (वय २०, रा.कुंजखेडा ता.कन्नड जि.औरंगाबाद), इरफान इब्राहिम पठाण (वय ३५), युसूफ असिफ पठाण (वय २२), गौसखॉ हानिफखॉ पठाण (वय ३४) रा.ब्राम्हणी गराडा ता.कन्नड जि. औरंगाबाद, अकिलखॉ ईस्माईलखॉ पठाण (वय २२ रा.कठोरा बाजार ता.भोकरदन जि.जालना) हे भागात दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीत असताना एक महिंद्रा कंपनीची ग्रे रंगाची स्कॉर्पिओ (एमएच १३ एन ७६२६) वाहनासह मिळून आले. म्हणून त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द् नवापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सकाळी ६.४५ वाजता अटक करण्यात आली होती.

दरम्यान, दि.५ डिसेेंबर २०२२ रोजी ९.०५ वाजेच्या सुमारास पाचही आरोपीतांनी नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअपची मागील खिडकी तोडून पलायन केले होते. म्हणून नवापूर पोलीस ठाण्यात पुन्हा भादंवि कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अवघ्या दोन तासापूर्वी अटक केलेल्या दरोड्याच्या पूर्व तयारीत असलेल्या आरोपीतांनी लॉकअपची खिडकी फोडून पलायन केल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी फरार आरोपीतांचा शोध घेण्याकामी स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीस ठाण्याचे ०६ वेगवेगळे पथके तयार करुन आरोपीतांचे मुळ गाव असलेले औरंगाबाद, जालना जिल्ह्यात, गुजरात, मध्यप्रदेश राज्यात रवाना केले.

पथकाने शोध मोहिम राबवून नवापूर तालुक्यातील सर्व परिसत पिंजून काढला. दि.५ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास लॉकअप तोडून पळालेला आरोपी हैदर ऊर्फ इस्त्राईल ईस्माईल पठाण (वय-२० रा.कुंजखेडा ता.कन्नड जि. औरंगाबाद) यास गुजरात राज्यातील उच्छल गावाच्या परिसरात स्थानिक पोलीसांच्या मदतीने पकडण्यात यश आले.

दि.८ डिसेंबर २०२२ रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून पळालेल्या आरोपीतांपैकी एक आरोपी अकीखॉं पठाण हा मध्यप्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यात खडकावाणी गावात त्याच्या नातेवाईकांकडे लपून बसल्याची खात्रीशिर बातमी मिळाली.

त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सदर माहिती कळवून स्थानिक गुन्हे शाखेचे तात्काळ एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ फरार आरोपीतास ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने मध्यप्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील खडकावाणी गाव गाठून सुरुवातीला त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला. खडकावाणी गावाच्या बाहेर जंगलातील शेतात राहात असल्याची माहिती काढली.

पथकाने त्याच्या नातेवाईकाचे खडकावाणी गावाच्या बाहेर जंगलातील शेताच्या आजूबाजूच्या परिसरात सापळा रचला, परंतू कुत्रे भूंकण्याच्या आवाजामुळे शेतातील झोपडीतून एक इसम पळतांना दिसून आल्याने पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. अकीलखॉं ईसमाईलखॉं पठाण असे त्याचे नाव आहे. त्यास ताब्यात घेवून नवापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार मुकेश तावडे, पोलीस नाईक सुनिल पाडवी, विशाल नागरे, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार अभय राजपुत, रामदास माळी यांच्या पथकाने केली.