जळगाव : पायी जात असलेल्या व्यक्तीच्याअंगावर मूकबधिर दुचाकीस्वाराने ज्वलनशील पदार्थ टाकला. यात ती व्यक्ती व दुचाकीस्वार दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मूकबधिरविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे.
दिलीप जोरसिंग राठोड (४५, रा. रामनगर) यांच्या अंगावर दुचाकीस्वार महेंद्र मधुकर साळुंखे (रा. मेस्को मातानगर) या मूकबधिराने ज्वलनशील पदार्थ टाकल्याने पादचारी भाजला गेला. यात दुचाकीस्वाराच्याही चेहऱ्यावर हा पदार्थ उडाल्याने त्याच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. ही घटना ३ सप्टेंबर रोजी मेहरून स्मशानभूमीजवळ घडली. याप्रकरणी मूकबधिरविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसर, दिलीप जोरसिंग राठोड (४५, रा. रामनगर) हे मजुरी काम करुन आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते ३ सप्टेंबर रोजी मेहरूण स्मशानभूमी परिसरातून पायी जात होते. त्यावेळी दुचाकीस्वार महेंद्र साळुंखे हा त्यांच्याजवळ आला व त्याने बाटलीमधील ज्वलनशील पदार्थ राठोड यांच्यावर चेहऱ्यावर, छाती, मान व हातावर फेकले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. ज्वलनशील पदार्थ फेकताना ते साळुंखे याच्याही चेहऱ्यावर उडाले.
याप्रकरणी साळुंखे यास अटक करण्यात आली आहे. तो मूकबधिर असल्याने तपासासाठी पोलिसांनी प्रश्नावली तयार केली असून, संशयिताकडून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मूकबधिर शाळेच्या शिक्षकांची मदत घेतली जात आहे. त्यातून त्याने हे कृत्य का केले, त्याचे साथीदार, सूत्रधार कोण आहे, याची माहिती समोर येणार आहे.