---Advertisement---
---Advertisement---
सावदा : येथील पाणीपुरवठा योजना, मांगलवाडी येथे कार्यरत असलेले दोन ठेकेदारी तत्त्वावरील कर्मचारी हे काम करीत असतांना शॉक लागून गंभीर जखमी झाले होते. या बाबतीत सावदा भाजपा व शिवसेना युतीतर्फे आज सोमवारी (28 जुलै ) रोजी ठेकेदारावर कार्यवाही करून त्यास काळ्या यादीत टाकण्याची मागणी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटल्यानुसार, ठेकेदाराने कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा तसेच सुरक्षेचे उपकरणे न पुरविल्यानेच हा अपघात घडलेला आहे. यासोबत कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा न भरणे अश्या अनेक गंभीर बाबी या ठेकेदाराने केल्याने कर्मचाऱ्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे नमूद करण्यात आले.
महत्वाचे म्हणजे कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढला गेला नसल्याने या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे. मुख्याधिकारी यांना देखील फोनवर सदर ठेकेदार उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यास तात्काळ प्रभावाने काळ्या यादीत टाकावे व जखमी कर्मचारी यांचे रुग्णालयाचे बिल व त्याने न भरलेला भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा याचे पैसे त्याच्या बिलातून वसूल करण्यात यावे . तसेच त्याची पुढील कामे थांबवावी अशी मागणी या निवेदनाद्वारे भाजपा-शिवसेना युतीतर्फे करण्यात आली.
यावर माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी, भाजपा तालुका सरचिटणीस महेश अकोले, भाजपा महिला तालुकाध्यक्ष लीना चौधरी, भाजपा माजी शहर अध्यक्ष जे. के. भारंबे, माजी नगरसेविका नंदाबाई लोखंडे, युवासेना शहरप्रमुख मनीष भंगाळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष संतोष परदेशी, प्रतीक भारंबे, निलेश खाचणे, मंदाकिनी वारके, गणेश माळी, यांचेसह भाजप शिवसेना युतीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.