---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : अनियमिततेसह शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या २२ कृषी केंद्रचालकांच्या परवान्यांवर गंभीर स्वरूपाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्या आदेशान्वये या कारवाईचे आदेश काढण्यात येणार आहेत.
दप्तर नोंदणी अनियमितता, खतांसह बियाण्यांचा साठा शिल्लक असतानाही शेतकऱ्यांना नकार देणाऱ्या, शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर चौकशीअंती दोषी सापडलेल्या आणि कारणे नोटीस बजावल्यानंतरही वेळेत उत्तर न देणाऱ्या २२ केंद्रचालकांवर ही कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
सर्वाधिक कारवाई कुठे ?
जि. प.च्या कृषी विभागातील जिल्हा भरारी पथक प्रमुख पद्मनाभ मस्के, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक विकास बोरसे यांनी गेल्या आठवड्यात चाळीसगावातील परवानाधारक कृषी केंद्रातील गैरप्रकार उघड केले होते.
त्यानंतर अमळनेरमधील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर स्थानिक निरीक्षकांकरवी पडताळणीसह तपासणीही करण्यात आली होती. चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाने तालुकानिहाय केंद्रचालकांवर कारवाई प्रस्तावित केली आहे.
दरम्यान, पथकांच्या चौकशीत आढळलेल्या गैरप्रकारांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या केंद्रचालकांविरोधात कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसार लवकरच कारवाईचे आदेश जारी केले जातील, अशी माहिती जिल्हा गुणवत्ता निरीक्षक विकास बोरसे यांनी दिली.