जळगाव : नायलॉन मांजा वापरावर बंदी असतांनाही उत्पादन, विक्री व वापर करत असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी यांनी शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पतंग गल्ली, जोशींपेठ जळगाव व भुसावळ शहरात भजेगल्ली सराफ बाजारात छापा टाकून कारवाई करण्यात आली.
जळगाव शहरातील पतंग गल्ली जोशीपेठ भागात किरण भगवान राठोड याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून ४ हजार ८०० रुपये किमतींच्या १६ नायलॉन मांजाचे चक्री जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच पतंग गल्ली येथूनच आरोपी कुणाल नंदकिशोर साखला याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ हजार ८०० रुपये किमतीचे ३२ नायलॉन मांजाचे चक्री जप्त करण्यात आल्या आहेत.
तिसरी कारवाई भुसावळ शहरात भज्जेगल्ली सराफ बाजारातील अजय काईट नावाचे दुकानावर छापा टाकुन करण्यात आली. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला आरोपी नितीन गोपाळ पतकी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून १ हजार ४०० रुपये किमतीचे ६ नायलॉन मांजाचे चक्री जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. या पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ रवि नरवाडे, अतुल वंजारी, गोपाल गव्हाळे, सचिन पोळ, प्रदिप सपकाळे, प्रदिप चवरे यांचा समावेश होता.