जळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तिघांविरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांना वेगवेगळ्या कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवार 27 रोजी स्थानबध्दतेच्या कारवाईचे आदेश काढले. जळगाव एमआयडीसी, यावल आणि फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिन्ही गुन्हेगारांवर वेगवेगळ्या कारागृहात स्थानबध्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कळविले आहे.
या तिघांमध्ये जळगाव शहरातील आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (वय-२४, रा. तुकाराम वाडी, जळगाव) याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळे स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल आहेत. तसेच आकाश मधुकर बिऱ्हाडे (वय-२२, रा. सिद्धार्थ नगर, यावल) हा यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत याच्यावर १० वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रवीण उर्फ डॉन गोपाळ तायडे (वय-२८, रा. पाडळसा ता. यावल) याच्यावर तब्बल १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी तिघांना नोटीस वाजवली होती, परंतु, त्यांच्यात कोणतीही सुधारणा दिसून आली नाही. यामुळे संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव केला. हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना सादर करण्यात आला.
यानुसार पोलीस तिघांच्या प्रस्तावांचे अवलोकन करत मंजूरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले. यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यानुसार रेकार्डवरील गुन्हेगार आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर याला नागपूर कारागृहात तर आकाश बिऱ्हाडे आणि प्रवीण उर्फ डॉन तायडे या दोघांना मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.