“…तर भारतातील सर्वात मोठी बंडखोरी इंदापूरात होईल” कार्यकर्त्यांचा थेट शरद पवारांना इशारा

इंदापूर : काही दिवसांपूर्वी भाजपात नाराज असलेले नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर निवडणुकीत इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्याची आता शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या निर्णयाने इंदापुरातील राजकीय चित्र पालटलं आहे.

हर्षवर्धन पाटील यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने इंदापुरातील शरद पवार गटाचे स्थानिक नेते नाराज झाले आहेत. इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात शरद पवारांच्या पक्षातील नेते एकवटल्याचं चित्र इंदापूरात दिसून आलं.या नेत्यांनी आज इंदापुरात भव्य मेळावा घेत प्रचंड शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी शरद पवार गटाचे नेते तथा सोनई ग्रुप संस्थापक दशरथ माने यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांना मोठा इशारा दिला. हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरातून उमेदवारीचा निर्णय शरद पवारांनी बदलला नाही तर भारतातील सर्वात मोठी बंडखोरी इंदापुरात होईल, असा मोठा इशारा दशरथ माने यांनी दिला आहे

काय म्हणाले दशरथ माने ?
“माझ्या राजकीय 35 वर्षाच्या कारकिर्दीत एवढी मोठी सभा पहिल्यांदाचं बघितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेलादेखील एवढे नागरिक जमत नाहीत. खासदार सुप्रिया ताई म्हणाल्या होत्या इंदापूरला महिला जमत नाहीत. जरा हे महिलांचं मोहोळ बघा. हे (हर्षवर्धन पाटील) पक्षात शिरले. आमच्या शरद पवारांचा तंबूच घेऊन गेले, पण इथे बांबू आहेत ना. अजूनही विनंती आहे. ही गर्दी पाहा आणि निर्णय बदला. निर्णय बदलला नाही तर भारतातली सगळ्यात मोठी बंडखोरी या इंदापुरात झाल्याशिवाय राहणार नाही. सांगली पेक्षा मोठा पॅटर्न इंदापूरमध्ये दिसणार. आम्ही एकत्र बसू आणि अपक्ष उमेदवार देऊ”, असा मोठा इशारा सोनई ग्रुपचे संस्थापक दशरथ माने यांनी दिला.