मसाल्यात रसायनांची भेसळ; कंपनीवर एलसीबीच्या पथकाने टाकली धाड, तीन जण ताब्यात

धुळे : येथील एमआयडीसीमधील एका गाळ्यामध्ये सुरू असलेल्या टॉवर मसाले या कंपनीवर एलसीबीच्या पथकाने धाड टाकली. तेथे मसाल्यात हानिकारक रंग आणि भेसळ आढळून आल्याने लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी संशयित इम्रान अहमद अख्तर हुसेन (वय ४३, रा. मुस्लीमनगर, धुळे), मसूद अहमद अब्दुल हलीम (४४, रा. मौलवीगंज, धुळे) आणि जहीद अहमद जलील अहमद अन्सारी (३४, रा. खातिमा मशीदजवळ, धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हे तिघे हानिकारक रंग आणि केमिकल्स मुंबई येथून आणायचे अशी प्राथमिक माहिती आहे. मुख्तार अन्सारी यांची टॉवर मसाले उत्पादक कंपनी आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यां कडून जप्त मुद्देमालाला तपासणीसाठी पाठविण्यात येईल. त्यानंतर प्राप्त अहवालानुसार संशयितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

जप्त केलेल्या मसाल्यामध्ये भेसळ आढळली आहे. या मुद्देमालाचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून पुढील कारवाई सुरू आहे.
– श्रीराम पवार, पोलिस निरीक्षक, धुळे.