---Advertisement---
---Advertisement---
मान्सूनपूर्व कपाशी महिन्याची होत नाही, तोच तिच्यावर लात्यासदृश रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी हैराण झाले. आता पुन्हा तालुक्यातील अनेक शेतातील तूर पीक पिवळे, तर मका पीक लाल-पिवळे पडत असल्यामुळे शेतकऱ्यांत धडकी भरली आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने मशागतीच्या कामांना वेग आला असतानाच उद्भवलेल्या परिस्थितीला नेमके कारण काय, याबाबत शंका-कुशंका व्यक्त केल्या जात असल्याने कृषी विभागाने याबाबत शेतबांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व ठिबक सिंचनावर कपाशी पेरली. ती आता महिन्याची झाली असून, काही प्रमाणात कपाशीची झाडे लालसर होऊन त्यांची वाढ खुंटत आहे. दोन वर्षांपूर्वीही ही परिस्थिती तालुक्यात
झाली असता, टप्प्याटप्प्याने अशी झाडे वाढत जाऊन शेकडो हेक्टरवरील हे पीक खराब झाले होते.
याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारीही केल्या होत्या; परंतु त्या तक्रारीचे पुढे काय झाले, हा संशोधनाचा विषय आहे. आता तर कपाशीनंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी लावलेले मका व तूर ही पिकेही लाल, पिवळे पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. अगोदरच अवकाळी व निसर्गाच्या सततच्या अवकृपेमुळे शेतकरी संकटात असताना अशा उद्भवलेल्या संकटाने उत्पन्नात पुन्हा घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी कृषी विभागाने नेमकी ही परिस्थिती कशामुळे होत आहे व यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत योग्य तो सल्ला देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची गरज यातून निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी पेरावे तरी काय ?
तालुक्यात सिंचनाचा अभाव असल्याने कोरडवाहू शेतीवर येथील शेतकऱ्यांना पिकाचे नियोजन करावे लागत आहे. थोड्याफार विहिरीतील पाण्यातून तालुक्यातील शेतकरी ठिबक सिंचनातून कपाशीला प्राधान्य देत असले, तरी गेल्या काही वर्षांपासून लाल्यासदृश रोग व इतर रोगांना बीजी-२ हे वाण त्वरित बळी पडत असल्यामुळे हे पीक उत्पादनालाही महाग होत आहे. तीच परिस्थिती येथील मुख्य पीक असणाऱ्या मका व तुरीची यावर्षी झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरावे तरी काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
- मी यावर्षी खरीप हंगामात दरवर्षीप्रमाणे तूर हे पीक पेरले आहे; परंतु पहिल्यांदाच यावर्षी हे पीक वाढ खुंटून पिवळसर होत असल्याने नेमकी ही परिस्थिती कशामुळे झाली, हे समजणे कठीण झाले आहे. पिकाची हीच परिस्थिती राहिल्यास उत्पादनात मोठी घट येणार आहे. यासाठी याबाबत योग्य ते मार्गदर्शन देण्यासोबतच होणाऱ्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी, ही अपेक्षा आहे.
सुनील नानासाहेब सोनवणे (शेतकरी, तन्हऱ्हाडी, ता. शिरपूर)