---Advertisement---
लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक टप्पा असतो. योग्य जोडीदार मिळाला, तर आयुष्य आनंदी होईल अशी आशा अनेक मुली मनात बाळगतात. प्रामाणिकपणा, सत्य आणि विश्वासावर नातं टिकेल अशी अपेक्षा असते. मात्र काही वेळा लग्नानंतर हळूहळू वास्तव समोर येतं आणि तेच नातं त्रास, वेदना आणि वादाचं कारण बनतं. उत्तर प्रदेशातील नोएडामधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एका महिलेने आपल्या पतीसह सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत.
नोएडामध्ये राहणाऱ्या लविका गुप्ता यांनी पती संयम जैन आणि त्याच्या चार नातेवाईकांविरोधात बिसरख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एफआयआरनुसार, लविका आणि संयम यांचा विवाह १६ जानेवारी २०२४ रोजी झाला होता. मात्र लग्नाआधी काही महत्त्वाच्या गोष्टी मुद्दाम लपवण्यात आल्या आणि चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. याच माहितीच्या आधारे तिने लग्नासाठी होकार दिल्याचं तिचं म्हणणं आहे.
तक्रारीत लविका गुप्ता यांनी नमूद केलं आहे की, लग्नापूर्वी पती बी.कॉम. शिक्षण पूर्ण केलेलं असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र लग्नानंतर समजलं की संयम जैन याचं शिक्षण केवळ बारावीपर्यंतच आहे. इतकंच नव्हे, तर पतीच्या उत्पन्नाबाबतही चुकीची माहिती देण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. लग्नाआधी संयम जैन यांचं वार्षिक उत्पन्न १८ लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र हा दावा पूर्णपणे असत्य असल्याचं नंतर समोर आलं, असं महिलेने नमूद केलं आहे.
लविका गुप्ता यांनी तक्रारीत आणखी एक धक्कादायक आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, लग्नाआधी पतीकडे घनदाट आणि नैसर्गिक केस असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र संयम जैन टक्कल लपवण्यासाठी विग किंवा हेअर पॅच वापरत असल्याचं लग्नानंतर लक्षात आलं. ही गोष्ट मुद्दाम लपवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणाची नोंद पोलिसांनी घेतली असून सध्या तपास सुरू आहे. तक्रारीतील सर्व आरोपांची शहानिशा केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.









