Pink Rickshaw Yojana: लाडकी बहीण योजनेबरोबरच राज्यात दहा हजार महिलांना ‘पिंक ई-रिक्षा’ देण्याच्या कार्यक्रमाचा आरंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे पार पडला.या कार्यक्रमात पात्र महिला लाभार्थ्यांना पिंक ई-रिक्षाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि आ.आशिष देशमुख यांनी या पिंक ई-रिक्षामधून प्रवास केला.
महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत मार्फत महाराष्ट्रातील दहा हजार गरजू महिलाना “पिंक ई रिक्षाचे वाटप” आज (20 एप्रिल) रोजी नागपुरात करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या योजनेची नागपुरातून सुरुवात झाली. या योजनेअंतर्गत एकूण 8 जिल्ह्यात दहा हजार पिंक ई-रिक्षा वाटप केल्या जाणार आहेत.
काय आहे योजनेचे उद्दिष्ट?
लाडकी बहीण योजनेसारखीच ही पिंक इ रिक्षा योजना आहे. राज्यातील दहा हजार महिलांना रोजगार देण्या सोबतच शहरात महिलांना सुरक्षित सार्वजनिक वाहतुकीचे साधन मिळेल. या माध्यमातून महिलांना स्वतःचा रोजगार निर्माण करता येईल, तसेच कामकाजी महिलांना प्रवासात सेफ, सुरक्षित वातावरण तसेच रात्री अप-रात्री महिला या पिंक इ-रिक्षाच्या माध्यमातून सुरक्षित फिरू शकतील,असे या योजनेमागे उद्दिष्ट असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
या योजनेत पिंक ई रिक्षाच्या एकूण किमती पैकी 20% अनुदान राज्य सरकार देणार असून दहा टक्के रक्कम लाभार्थी महिलांना द्यावी लागणार आहे. तर उर्वरित 70 टक्के रक्कम सवलतीच्या व्याजदरावर कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, अमरावती या आठ जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने पिंक ई रिक्षा गरजू महिलांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.