चांद्रयान मोहिमेनंतर..

ऑगस्ट 2023 ला चांद्रयान मोहीम यशस्वी झाली. संपूर्ण जग डोळ्यात प्राण आणून चांद्रयान मोहिमेचा क्षण बघत होते. विशेषतः भारतीयांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती. चांद्रयान चंद्रावर उतरताच लोकांनी जल्लोष केला. चौकाचौकात तिरंगा घेतलेले तरुण, आबालवृद्ध घराच्या बाहेर पडू लागले. लोकांनी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद साजरा केला. करोडो देशवासीयांकरिता हा गौरवाचा क्षण होता. काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मात्र कुठलाही आनंद व्यक्त केला नाही. काही राजकीय नेत्यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करून सरकार किंवा नरेंद्र मोदी यांचा या यशातील सहभाग नाकारला. काही जातीयवादी, संप्रदायवादी, अर्बन नक्षली, संविधान विरोधी यांना भारताची ही प्रगती पाहून दुःख झाले असेल. कारण काही वेगवेगळ्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप’वर ज्यावेळेस चांद्रयानाचा हा मेसेज टाकला गेला त्यावेळेस आनंद व्यक्त करणारेसुद्धा ठरलेलेच होते व यावर कुठलीही प्रतिक्रिया न देता हवापाण्याचे संदेश पाठविणारेही ठरलेलेच होते. काही नेते म्हणाले की, इस्रोची स्थापना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये झाली होती. कोणीही हे नाकारत नाही व नाकारण्याचे कारणही नाही.

म्हणजे चांद्रयान मोहिमेचे  श्रेय तुम्हाला जवाहरलाल नेहरू व काँग‘ेसला द्यायचे आहे का? द्यायचे असेल तर द्या. परंतु भारताचे विभाजन, काश्मीर प्रश्न आणि तिबेट चीनला देऊन निर्माण झालेला भारत-चीन सीमा विवाद यांचेही श्रेय त्यांनाच द्यायचे का हे तुम्ही ठरवा. एखाद्या शाळेचे गुणवत्ता यादीत अनेक विद्यार्थी आले तर त्याचे श्रेय समाज, विद्यार्थी, पालक, मु‘याध्यापक, शिक्षक व त्यावेळेसचे संस्थाचालक यांना देतो. हे श्रेय जर कोणी शाळेच्या संस्थापकांना देत असेल तर त्यांनी द्यावे. कारण त्यावर्षीची गुणवत्ता यादी ही त्यावर्षीच्या शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या व संस्थाचालकांच्या परिश्रमाचे फळ असते. जवाहरलाल नेहरू यांची आठवण करणारे लोक नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व का नाकारत आहेत, असा प्रश्न पडतो. जवाहरलाल नेहरू यांच्या योगदानाचे स्मरण ठेवणे यात गैर काहीच नाही, परंतु नरेंद्र मोदी व सरकार यांचाही यशामध्ये सहभाग आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये जी अणुचाचणी झाली त्याचे श्रेय फक्त वैज्ञानिकांनाच होते का? त्यावेळेस काँग्रेसने व इंदिरा गांधींनी ते श्रेय घेतले नव्हते का? जनतेनेही त्यांना ते श्रेय दिले नव्हते का? 1971 च्या युद्धाचे श्रेय काँग्रेसने व इंदिरा गांधींनी घेतले नाही का? मग चांद्रयान मोहिमेच्या यशाचे श्रेय नरेंद्र मोदी सरकारचे का नाही? असे दुहेरी मापदंड काही लोक लावताना दिसतात. परंतु सुज्ञ जनता याचा विचार करू शकते.

या देशांमध्ये अनेक जातिपंथ संप्रदायाचे लोक राहतात. परंतु देश काही नद्या-नाले-पर्वतांनी बनत नाही. तो माणसांनी बनतो. इंग‘जांनी ज्याला स्वातंत्र्य दिले, ज्याच्या भौगोलिक सीमा आखून दिल्या त्या भौगोलिक सीमांचा मिळून एक देश बनत नाही तर या देशात राहणार्‍या लोकांच्या जय-पराजयाच्या, सुख-दुःखाच्या भावना समान असायला पाहिजे. अशा लोकांनी देश बनतो. आपापसातील मतभेद विसरून लोकांनी राष्ट्रीय विषयावर एकत्र यायला पाहिजे. महाभारतामध्ये पांडवांची फजिती करण्यासाठी वनात आलेल्या दुर्योधनाला ज्यावेळेस गंधर्वांकडून बंदी बनविले जाते त्यावेळेस युधिष्ठिर आपल्या भावांना त्यांच्या मदतीकरिता जाण्याचा आदेश देतो व तो म्हणतो की, ‘वयं पंचाधिकं शतम.’ ज्यावेळेस आमच्यावर एखादे संकट येईल त्यावेळेस आम्ही 105 आहोत. ज्यावेळेस आमचे आपापसातील विषयांवर मतभेद असेल त्यावेळेस कौरव शंभर असेल व आम्ही पांडव पाच असू.

जगभरातील प्रसिद्धी माध्यमांनी भारताचे, इस्त्रोचे, सरकारचे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. भारताच्या या यशाने जगभरात राहणार्‍या भारतीयांची मान ताठ झालेली आहे. आम्ही जगाला केवळ नोकरी मागणारे लोक नाही तर चांद्रयान चंद्रावर पाठविणारे लोक आहोत, अशा पद्धतीचा संदेश आज जगभरामध्ये गेलेला आहे. भारताशी ज्यांना व्यापारी करार करायचे आहे त्यांच्याही हे लक्षात आलेले आहे की, ही भूमी मनुष्यबळाची, कुशल तंत्रज्ञांची, साधनसंपत्ती असलेली भूमी आहे. येणार्‍या काळामध्ये जगामध्ये ज्या काही तंत्रज्ञानविषयक सुधारणा होतील भारताचे त्यामध्ये नक्कीच योगदान असेल. आज जग भारताकडे बघत आहे. त्यांच्या दृष्टीने भारतामध्ये एक प्रगत व भारताला तंत्रज्ञानामध्ये समोर नेवू इच्छिणारा समाज या देशामध्ये राहत आहे. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला. त्यावेळेस त्याच्या काही तास अगोदर  पाकिस्तान स्वतंत्र झाला. दोन्ही देश काही तासांच्या फरकाने स्वतंत्र झाले. परंतु पाकिस्तान आज कुठे आहे. धार्मिक कट्टरवादामुळे ज्याचा जन्म झाला व ज्याने स्वतःला दहशतवादाचे उत्पादन केंद्र बनविले. जो जगाच्या शांततेचा मारेकरी राहिलेला आहे. असा पाकिस्तान आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. दुसरीकडे शांततेच्या मार्गाने सर्वांना सोबत घेऊन चालणारा भारत आज चांद्रयान चंद्रावर पाठविण्यास यशस्वी ठरलेला आहे. हा दोन संस्कृतीमधला फरक आहे.

दोन विचारधारांमधला फरक आहे. जर तुमची विचारधारा बरोबर नसेल, जर तुमचे मनसुबे बरोबर नसतील तर वेगळा देश मिळूनसुद्धा तुम्ही प्रगती करू शकणार नाही. हे पाकिस्तानच्या उदाहरणाने आता स्पष्ट झालेले आहे. चांद्रयानाचे यश हे नेत्रदीपक आहे. विद्यार्थ्यांसाठी हे यश प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांचा ऊर अभिमानाने भरून यायला हवा की आम्ही अशा देशाचे नागरिक आहोत; जो देशचंद्रावर चांद्रयान पाठवू शकतो. जो देश मंगळावर मंगलयान पाठवू शकतो. जो सूर्यावरही यान पाठविण्याची तयारी करीत आहे. परंतु हे शास्त्रज्ञ काही आकाशातून आलेले नाही तर तेही याच शिक्षण पद्धतीचा भाग होते. त्यांनी अडीअडचणींचा सामना केलेला आहे व स्वतःच्या कठोर परिश्रमांच्या भरोशावर ते भारताच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, आमच्या शिक्षणाचा उपयोग आम्हाला आमच्या कुटुंबाकरिता, स्वतःकरिता व देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी करायचा आहे. यासाठी भारताला प्रगत बनविण्याचे डोळ्यांमध्ये स्वप्न असायला हवे. त्यासाठी कठोर परिश्रमांची, अनुशासनाची, चिकाटीची व प्रभावी इच्छाशक्तीची जोड द्यायला हवी. असे विद्यार्थी येणार्‍या काळात भारत भाग्यविधाते ठरू शकतात व भारताची मान जगामध्ये उंचावू शकतात.