जळगाव : पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशातील दौरे रद्द केले आणि तातडीने भारतात दाखल झाले. त्यांनी आक्रमक पवित्र घेत पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये जाणारे नदीचे पाणी आडविले. पाणी देणे हे धर्माचे काम आहे परंतु पाकिस्तान जर भारतीयांवर अशा पद्धतीने हल्ला करत असेल तर त्यांच्यावर दया दाखवणे हे चुकीचे आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णयाचं देशभरात स्वागत केले जात आहे, असे मत ना. गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. Pahalgam Terror Attack
अशा पद्धतीचा क्रूर कृत्य कुणीच करू शकत नाही. ज्या ठिकाणी एकही पोलीस नाही त्या ठिकाणी पर्यटक फिरत होते, आनंद लुटत होते. याचा गैरफायदा घेत दहशतवाद्यांनी हल्ला केला. चार लोक बंदूक घेऊन येतात, बेछूट गोळीबार करतात, त्यांची हिंमत असेल तर भारतीय सैनिकांसमोर सामना करावा, तुमचे तुकडेदेखील पाकिस्तानात पोहचू देणार नाही. संपूर्ण देश नरेंद्र मोदींच्या पाठीमागे आहे आणि ही कारवाई नक्कीच होईल, असा विश्वासही ना. पाटील व्यक्त केला.
आता मातीत गाडण्याची वेळ आलीय; पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यांना थेट इशारा
बिहार : पहलगाममध्ये ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला, ज्यांनी या हल्ल्याचा कट रचला, त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल. आता दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आलीय. दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांच्या मालकांचे कंबरडे मोडेल, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुरुवारी बिहारमधील मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त एका जाहीर सभेला संबोधित केले. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचे हे पहिलेच भाषण होते. यावेळी मोदींनी प्रथम पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आणि आपले भाषण सुरू केले.