आपले सरकारच्या ऑपरेटरांच्या अत्यल्प मानधनावर ‘एजन्सीचा डोळा’

रामदास माळी 

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव – जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागांतर्गत सीएससी या खासगी एजन्सीला प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीत असलेल्या आपले सरकारच्या ऑपरेटरसह इतर खर्चापोटी वर्षांला १ लाख ४७ हजार रुपये दिले जातात. त्यात महिन्याला आपले सरकारच्या ऑपरेटरसह इतर खर्चापोटी १२ हजार २५१ रुपये दिले जातात. मात्र त्यात ऑपरेटरचे अत्यल्प ७ हजार मानधनाची नोंद आहे. अत्यल्प मानधनावर त्यांची सेवा सुरू असल्याचे चित्र आहे. या खर्चाच्या रकमेवर संबंधित एजन्सी डल्ला मारीत असल्याचे सागण्यात येत आहे. जिल्हयातील ८५३ ऑपरेटर अत्यल्प मानधनावर सेवा बजावत आहे.

जिल्ह्यातील ग्रा.पं.संख्या ११५३ आहे तर आपले सरकार ऑपरेटरची संख्या ८५३ इतकी आहे. 

ऑपरेटरच्या मानधनाव्यतिरिक्त इतर खर्चाच्या रकमेचे ५ हजार २५१ रुपयाच्या खर्चाचा उल्लेख आहे. त्यात इतर खर्चातील बहुतांश बाबी आपले सरकारच्या ऑपरेटरला करावा लागतो. मात्र त्यांची रक्कम संबंधित एजन्सी देत नसल्याचे ऑपरेटराचे म्हणणे आहे. तसेच स्टेशनरीचा खर्च ग्रामपंचायतींना या एजन्सीकडून दिला जाण्याची तरतुद जिल्हा परिषदेने केली आहे. त्यापोटी २७०० रुपये महिन्याला जि.प.कडून या एजन्सीला स्वतंत्र दिले जातात. सीएससी एजन्सी या ऑपरेटरच्या मानधनातील विशिष्ट रक्कम हडप करीत असल्याचे दिसून येते.

मात्र तरीही सीएससी ही खाजगी एजन्सी इतर खर्चही ऑपरेटराच्या माथी मारते. त्यामुळे करारावर नियुक्त केलेल्या आपले सरकारच्या ऑपरेटरांना काम करतांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात आपले सरकार सेवा केद्रांमध्ये ई पंचायत प्रकल्प इतर अनुषंगिक योजना बाबतची माहिती संगणक, संकेतस्थळावर भरण्यासाठी व त्यांचे अद्यावतीकरणासाठी, आवश्यक त्या माहितीचे संकलन, दफ्तर आपले सरकार सेवा केंद्र यांना अद्यावत करून देण्यासाठी या आपले सरकारच सेवा केंद्रांची भूमिका महत्वपूर्ण आहे. त्यात ऑपरेटरचे मानधन ७ हजार तर इतर खर्चापोटी ५ हजार रकमेची तरतुद कुठल्या आधारावर करण्यात आली. याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत अहे. यातील ऑपरेटरांचे ७ हजाराचे मानधन वगळता इतर खर्चाची पाच हजार रुपयावर संबंधित एजन्सी डल्ला मारीत असल्याचे दिसून येते.

आपले सरकार ऑपरेटरांचे सर्व कामकाज खाजगी एजन्सीकडून होते. एजन्सीच त्या ऑपरेटरांना मानधन देते. त्यामुळे त्यात आमच्या विभागाची भूमिका नाही.

– अनिकेत पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
ग्रामपंचायत विभाग जि.प.जळगाव