नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील सीमा वादाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत दोन्ही देशांमध्ये करार झाला आहे. भारत आणि चीनमध्ये पुन्हा गस्त घालण्यावर एकमत झाले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली.
विशेष म्हणजे हि महत्त्वाचा घडामोड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १६व्या ब्रिक्स परिषदेसाठी रशियाला जाण्यापूर्वी घडली आहे. रशियामध्ये 22 ते 23 ऑक्टोबर दरम्यान ब्रिक्सची बैठक होणार आहे. एलएसीवरील गस्तीबाबतच्या करारावर परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले की, गेल्या अनेक आठवड्यांपासून झालेल्या चर्चेच्या परिणामी, भारत-चीन सीमा भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त व्यवस्थेवर एक करार झाला आहे. करारानुसार, दोन्ही देशांचे सैन्य डेपसांग आणि डेमचोकमधील त्यांच्या जुन्या ठिकाणी परत जातील. यासोबतच बंद असलेल्या बफर झोनमध्ये गस्त घालण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संभाव्य द्विपक्षीय बैठकीबाबत विचारले असता विक्रम मिसरी यांनी सांगितले की, भारत आणि चीन यांच्यात अलीकडच्या काही आठवड्यांत राजनैतिक आणि लष्करी चर्चा सुरू आहेत. 2020 पासून भारत आणि चीनमध्ये सीमा विवाद आहे. चीनने सीमेवरील स्थिती बदलल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला होता. गलवानमध्ये चिनी आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक झाली. यानंतर दोन्ही देशांकडून LAC वर सैन्याची तैनाती वाढवण्यात आली होती.