रवींद्र मोराणकर
जळगाव : शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी शासन पातळीवर विविध योजनांद्वारे प्रयत्न होत आहेत. असे असले तरी केशवस्मृती प्रतिष्ठानच्या ‘समग्र कृषी व ग्रामीण विकास प्रकल्प’, जळगाव जनता सहकारी बँक व अग्रेरियन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस एल.एल.पी.ने दुग्धोत्पादनाच्या माध्यमातून डिसेंबर २०१४ अखेर अनेक शेतकऱ्यांच्या अर्थार्जनात वाढ केली आहे व ती सुरू आहे. जळगाव जनता सहकारी बँकेच्या ‘दुग्ध संपदा’ योजनेतून हा बदल झाला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांकडून मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता जळगाव जनता सहकारी बँकेने कर्ज मर्यादेतही दुपटीने वाढ केली आहे. याशिवाय पहिल्या टप्प्यात तीन तालुके असताना आता त्यात जिल्ह्यातील पंधरापैकी १२ तालुक्यांमधील दुग्धोत्पादकांना याचा लाभ मिळणार आहे.
श्रद्धेय, सेवाभावी डॉ. अविनाश आचार्य यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विविध प्रकल्प राबवले जातात. हे प्रकल्प आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, आरोग्य यासह विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. यातीलच एक प्रकल्प ‘समग्र कृषी व ग्रामीण विकास प्रकल्प’ होय.
केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भरतदादा अमळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या समग्र कृषी व ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रमुख ‘आत्मा’चे निवृत्त प्रकल्प संचालक अनिल भोकरे आहेत.
अनिल भोकरे यांनी गेल्या आठ-दहा महिन्यांपूव ‘समग्र कृषी व ग्रामीण विकास प्रकल्पा’च्या माध्यमातून १० जणांच्या समितीद्वारे विविध शेतकरी व शेतकरी गटांचे सर्वेक्षण केले. त्यात आपण शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो, कोणत्या योजना देऊ शकतो, त्यांचा शेतकऱ्यांना किती ग्रामीण भागात फायदा होऊ शकतो, याचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून अभ्यास केला, त्यांच्याशी चर्चा केली असता ग्रामीण भागात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाला भरपूर वाव आहे. शुद्ध व गुणवत्तापूर्ण दुधाचा तुटवडा असल्याने व सेंद्रिय खताचा वापर वाढविण्यासाठी जनता बँकेच्या पुढाकाराने ‘दुग्ध संपदा’ ही योजना अस्तित्वात आली. सादर केलेल्या प्रस्तावांवर जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाणे, उपाध्यक्ष डॉ. अनिल राव व डॉ. अतुल सरोदे तसेच सर्व संचालक यांनी प्रायोगिक तत्त्वावर तीन तालुक्यात राबविण्याचा शुभारंभ २१ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आला.
पहिल्या टप्प्यात जून २०२४ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील तीन तालुक्यांची निवड केली. त्यात धरणगाव, पाचोरा व एरंडोल या तीन तालुक्यांतून १०० शेतकरी लाभाथ निवडले गेले. त्यामधून बँकेच्या व शासनाच्या नियमानुसार ६२ शेतकरी अंतिमरीत्या निवडण्यात आले. शेतकरी उद्योजकांना ४ कोटी ४२ लाख रुपये कर्ज मंजूर झाले. जळगाव जनता सहकारी बँकेने या शेतकऱ्यांना हे कर्ज वाटप केले. केवळ कर्ज वाटप करून न थांबता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची अग्रेरियन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस एल.एल.पी., बँकेने आणि समग्र कृषी व ग्रामीण विकास प्रकल्पा’च्या समितीने आढावा घेणे सुरू ठेवले.
सहा महिन्यांनंतर या योजनेची फलनिष्पत्ती समोर आली आणि बँकेने कर्ज मर्यादेत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात ४ कोटी ४२ लाख रुपये कर्ज दिल्यानंतर आता ती रक्कम आठ कोटींवर पोहोचली आहे. याशिवाय लाभाथ संख्येतही वाढ होणार आहे. यामध्ये या योजनेतून प्रकल्यपाच्या किमतीच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त ७ लाख अनुदान मिळणार आहे. सदर विभागाचीदेखील शेतकऱ्यांच्या प्रति सहकार्याची भूमिका असल्याने ‘दुग्ध संपदा’ मोहिमेला चालना मिळत आहे.
समग्र कृषी व ग्रामीण विकास प्रकल्प व अग्रेरियन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस एल.एल.पी.च्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी जळगाव जनता सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. जून २०२४ मध्ये तीन तालुक्यांमधील शेतकऱ्यांना ४ कोटी ४२ लाख रुपये कर्ज वाटप केले. दूध संकलन दुप्पट झाले असून, कमीत कमी ६० रुपये प्रती लीटर भाव मिळत आहे व शेतकरी नियमित कर्ज हप्ता भरत आहेत. त्याची वसुली होतेय. आउटपुट मिळत आहे, यामुळे आमच्या कामाचा हुरूप वाढला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून युवकांना रोजगार गावातच मिळावा यासाठी केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भरतदादा अमळकर यांचा प्रयत्न आहे. याशिवाय जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने आणि त्यांच्या पूर्ण टीमने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. इतर सर्व बँकांनी याच आधारावर मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
-अनिल भोकरे, प्रमुख, केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समग्र कृषी व ग्रामीण विकास प्रकल्प, जळगाव.
नंदगाव (ता. जळगाव) येथे ‘रिद्धीसिद्धी स्वयंसहायता महिला समूह’ या बचत गटात मी सदस्या आहे. दुग्ध संपदा योजनेंतर्गत मला दुग्ध व्यवसायासाठी जळगाव जनता सहकारी बँकेने पाच लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले. या कर्जावर 35 टक्के अनुदान आहे. ‘पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (पीएमईजीपी) योजनेबद्दल अग्रेरियन कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे प्रमुख अनिल भोकरे यांनी मला माहिती दिली. तसेच जळगाव जनता सहकारी बँकेने दुग्ध व्यवसायासाठी कर्ज देवून मोठा हातभार लावला आहे. यानंतर आता मी म्हशी खरेदी करून दुग्ध व्यवसायात वाढ केली आहे. ‘पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम’ योजनेचा लाभ घेण्यासाठी जळगाव जनता सहकारी बँक आणि अनिल भोकरे यांनी सहकार्य केले. याबद्दल त्यांची मी ऋणी आहे. इतर भगिनींनीही या योजनेचा लाभ घेऊन कुटुंबाला हातभार लावावा आणि भरभराट करावी, अपेक्षा आहे.
-प्रीती वीरेंद्र पाटील , ‘रिद्धीसिद्धी स्वयंसहायता महिला समूह’ बचत गट सदस्या, नंदगाव (ता. जळगाव)