Agriculture News: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! जळगावातील 30 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सिंचन संदर्भात ही बातमी असून भागपूर उपसा सिंचन योजनेच्या 3,533 कोटींच्या सुधारित प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. मंत्री मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यानुसार ही मंजूरी मिळली आहे. शेतकऱ्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय असून सुधारित योजनेमुळे सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याचा लाभ जळगाव तालुक्यातील भागपूर- वावडदासह 25 गावांच्या, तसेच जामनेर व पाचोरा तालुक्यांतील शेतकऱ्यांना होत. या भागातील जवळपास 30 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल.

या पुर्वी या प्रकल्पासाठी सन 1999-2000 मध्ये या 557 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मूळ प्रकल्पाअंतर्गत 18,141 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट होते. परंतु, वाघूर प्रकल्पामुळे यातील 4237 हेक्टर क्षेत्र वगळण्यात आले. आता सुधारित प्रस्तावानुसार 30,764 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यात 13,904 हेक्टर मुळ भागपूर प्रकल्पाचे, 15,465 हेक्टर मध्यम आणि लघु प्रकल्पाचे पुनर्स्थापित क्षेत्र, तसेच नव्याने प्रस्तावित गोलटेकडी व एकुलती साठवण तलावांमुळे 1395 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

तापी नदीवर ही योजना राबविली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याचा परिसरातील सिंचनासाठी उपयोग केला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत तापी नदीवरील शेळगाव बॅरेजमधून वाघूर नदीकाठच्या भागात पाणी साठवले जाणार आहे. यामुळे जळगाव तालुक्यातील २५ गावाना, अजिंठा डोंगराच्या पायथ्यापासून ते पाचोरा तालुक्यापर्यंतच्या क्षेत्राती 16,860 हेक्टर जमिनीला लाभ होणार आहे. या प्रकल्पावर मार्च 2024 अखेर या प्रकल्पावर 522.53 कोटी रुपये खर्च झाले असून, पुढील टप्प्यात 3010.52 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुधारीत प्रस्तावाच्या निधीतून भूसंपादन, अभियांत्रिकी बदल आणि इतर कामे केली जाणार आहे.

दरम्यान, या प्रकल्पाबद्दल शेतकऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व आपत्ती व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे आभार मानले आहे.