---Advertisement---
ऑपरेशन सिंदूरमध्ये वायुदलाने ब्रम्होसच्या मदतीने पाकिस्तानला गुडघे टेकविण्यास भाग पाडले आणि जगाला भारताच्या स्वदेशी शस्त्रांची ताकद कळली. ब्रम्होसचे महत्त्व लक्षात घेत आता वायुदल आणि नौदलाने मोठ्या प्रमाणात ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
संरक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय वायुदल आणि नौदल ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे खरेदी करणार असून, यासाठी लवकरच प्रक्रिया पार पाडली जाईल. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाची लवकरच एक उच्चस्तरीय बैठक होणार आहे.
दोन्ही दलाची क्षमता वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजुरी दिली जाणार आहे.
ही खरेदी भारतीय नौदलाच्या युद्धनौका आणि वायुदलाच्या लढाऊ विमानांसाठी केली जाईल.नौदल त्यांच्या वीर श्रेणीच्या युद्धनौकांमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करेल. त्याचवेळी वायुदल त्यांच्या लढाऊ विमान एसयू – ३० एमकेआयच्या ताफ्यात ही क्षेपणास्त्रे तैनात करणार आहे. ब्रह्मोस ही एक लांब पल्ल्याची सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र प्रणाली आहे जी जमीन, समुद्र आणि हवेतून डागता येते.
ब्रह्मोस ही प्रणाली डीआरडीओ, भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केली आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकविरोधात केलेल्या कारवाईत प्रामुख्याने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर केला आणि दहशतवाद्यांच्या अड्डयावर अचूकतेने लक्ष्य केले. ब्रह्मोसचा माऱ्यामुळे काही तासांतच पाकिस्तानने शरणागती पत्करली होती.