अहमदाबाद येथे १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्यानंतरही एअर इंडियाच्या अडचणी संपलेल्या नाहीत. मंगळवारी दिवसभरात विविध शहरांमधून आंतरराष्ट्रीय उड्डाण घेणाऱ्या तीन विमानांसह एकूण सात विमाने रद्द करण्यात आली.
मंगळवारी सकाळी अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द झाले. त्यानंतर अमृतसरहन लंडनला जाणारे विमानही रद्द करण्यात आले. आता दिल्लीहून पॅरिसला जाणारे एअर इंडियाचे विमान रद्द करण्यात आले आहे. दिवसभरात एअर इंडियाची सात उड्डाणे रद्द झाली आहेत.
त्यापैकी सहा विमाने ही बोईंग ड्रीमलाईनरशी संबंधित होती. एअर इंडियाच्या वतीने याबद्दल निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात म्हटले की, एअर इंडियाच्या एआय१४३ विमानाची पूर्वतपासणी करण्यात आल्यानंतर त्याचे उड्डाण रद्द करण्यात आले. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले, १७ जून रोजी दिल्लीहून पॅरिसला जाणारे एआय-१४३ हे विमान रद्द करण्यात येत आहे.
रह झालेली उड्डाणे
- दिल्ली ते दुबई
- दिल्ली ते व्हिएन्ना
- दिल्ली ते पॅरिस
- अहमदाबाद ते लंडन
- लंडन ते अमृतसर
- बंगळुरू ते लंडन
- मुंबई ते सॅन फ्रान्सिस्को
नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग
कोचीन येथून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या ६ ए-२७०६ विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. सुरक्षेचा उपाय म्हणून मंगळवारी सकाळी या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले. कोचीन येथील एअर ट्रॅफिक कंट्रोलला बॉम्बच्या धमकीचा संदेश प्राप्त झाल्यानंतर हे विमान नागपूर विमानतळाकडे वळविण्यात आले. सकाळी ११.२३ वाजता नागपूर येथे ते सुरक्षितपणे उतरविण्यात आले. या विमानात १५७ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते.