Aitareya Upanishad-Rig Veda ऐतरेयोपनिषद हा ऋग्वेदांतर्गत येणारा उपनिषद आहे. या उपनिषदाचे कर्ते ऋषी महर्षी ऐतरेय महिदास आहेत. त्यांच्या आईचे नाव इतरा देवी होते. ते नितांत मातृभक्त असल्यामुळे त्यांनी त्यांचे नाव ऐतरेय धारण केले आहे. त्यावरून हा ऐतरेय उपनिषद. विशेष म्हणजे त्यांचे कुळ दास कुळ असूनही त्यांनी प्रचंड अभ्यास करून हा उपनिषद निर्माण केला. ‘गुणकर्म विभागशः’ सूत्राचे महिदास ऐतरेय ऋषी हे सुंदर उदाहरण आहे. या उपनिषदाचे 3 अध्याय आणि 33 मंत्र आहेत. हे ब्रह्मविद्या प्रधान उपनिषद आहे. वेदोपनिषदातील सारगर्भ तत्त्वज्ञान सांगणारी चार महावाक्ये आहेत. 1) अहं ब्रह्मास्मी 2) आयमात्मा ब्रह्म 3) तत्त्वमसी 4) प्रज्ञानं ब्रह्म. यातील ‘प्रज्ञानं ब्रह्म’ हे महावाक्य ऐतरेय उपनिषदातील आहे. सृष्टीची रचना, मानवी शरीररचना, अन्नरचना याबाबत या उपनिषदात मंडण आहे. मानवाची निर्मिती, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, त्यांचा कार्यकर्ता आणि ज्ञाता कोण? मृत्यूनंतर पुढे काय? जगाचा रचियता कोण? सृष्टीचे कारण कोण? नियंत्रक कोण? पालनकर्ता कोण? यावर चर्चा याच उपनिषदात आहे.
Aitareya Upanishad-Rig Veda साधकांनी गृहस्थाश्रमात राहून साधना करावी की गृहत्याग करूनच साधना करावी? परब्रह्म उपासनेसाठी यातील समन्वयावरही इथे चर्चा आहे. ध्यान-धारणा-प्राणायाम यावरही चर्चा आहे. या उपनिषदाची सुरुवात प्रयोजन स्पष्ट करते.
ॐ आत्मा वा इदमेक इवाग्र असिन्नन्यत्किंचन मिशत् ।
स इक्षतलोकान्नुु सृजा इति ॥
सर्वांत पहिले एकमात्र केवळ आत्माच होता. ‘एकाकी न रमे म्हणोनी निर्मिली चौदाही भुवने’ या ओवीप्रमाणे आत्म्याला एकटे वाटू लागल्याने त्याने विचार केला आणि त्याने लोकरचना करायला सुरुवात केली.
स इमां ललोकानसृजत् । अम्भोमरीचिरमापोऽदोऽंभः
परेण दिवं द्यौः प्रतिष्ठाऽन्तरिक्षं मरीचयः ।
पृथिवी मेरो या अधस्तात्त आपः ॥
Aitareya Upanishad-Rig Veda त्याने अंभ, मरीची, मर आणि आप या चार लोकांची लोक रचना केली. द्युलोकाच्या पार स्वर्गात अंभ लोकाची रचना केली. अंतरिक्षात मरीची म्हणजे भुवलोकाची रचना केली. पृथ्वीवर मर लोकाची रचना केली. पृथ्वीच्या खाली पाताळात आप लोकांची रचना केली.
ऐतरेय ऋषी यांनी मनुष्याचे शरीर आणि विराट पुरुषाचे शरीर यातील समानता विशद केली आहे.
स इक्षतेमे नु लोका लोकपालन्नुु सृजा इति ॥
सोऽद्भ्य एव पुरुषंसमुद्धृत्यमूर्छयत् ॥ 3॥
मग त्या परम आत्म्याने लोकपाल म्हणजे मनुष्य तयार करण्याचे योजिले. त्यासाठी त्याने पाण्यातून पिंड काढून त्याला आकार देऊन अवयवयुक्त जलप्रधान पुरुष पिंड तयार केला. पिंड आणि ब्रह्मांड याचा सुरेख साम्यभाव गोड शब्दात सांगितला.
तमभ्यतपत्तस्याभितप्तस्य मुखं निरभिद्यत यथाऽण्डं
मुखाद्वाग्वाचोऽग्निर्नासिके निरभिद्येतं नासिकाभ्यां प्राणः ॥
प्राणाद्वायुरक्षिणी निरभिद्येतमक्षीभ्यां चक्षुश्चक्षुष आदित्यः कर्णौ निरभिद्येतां
कर्णाभ्यां श्रोत्रं श्रोत्रद्दिशस्त्वङ्निरभिद्यत त्वचो लोमानि लोमभ्य
ओषधिवनस्पतयो हृदयं निरभिद्यत हृदयान्मनोमनसश्चन्द्रमा
नाभिर्निरभिद्यत नाभ्या अपानोऽपानान्मृत्युः
शिश्नं निरभिद्यत शिश्नाद्रेतो रेतस आपः ॥4॥
Aitareya Upanishad-Rig Veda प्रथम परमात्म्याने मुख निर्माण केले ज्यात वागींद्रिय म्हणजे वाणीचे सामर्थ्य आले. त्यातून अग्नी निर्माण झाला. पुढे नासिका रंध्र म्हणजे घ्राणेंद्रिये ज्यातून वायू निर्माण झाला. त्यानंतर चक्षू म्हणजे डोळे ही दृष्टी इंद्रिये जिथे आदित्य सूर्य निर्माण झाला. नंतर कान ही श्रवणेंद्रिये त्यातून दिशा निर्माण झाल्या. त्यानंतर त्वचा या स्पर्शेंद्रियातून औषध वनस्पती निर्माण झाल्यात. हृदय या आंतरिंद्रायातून मन त्यातून चंद्रमा तर नाभीतून मलेंद्रिये त्यातून अपान वायू ज्याद्वारे मृत्यू निर्माण झाला. त्यानंतर जननेंद्रिये त्यातून रेतस ज्याद्वारे आप म्हणजे पाणी निर्माण झाले.
Aitareya Upanishad-Rig Veda या सर्व आप सूर्यादि देवता या पुरुषाच्या शरीरातून जलसागरात पडल्या. जेव्हा त्यांना तहान-भूक सतावू लागली तेव्हा त्या देवता परमात्म्याला म्हणाल्या, आमचे आश्रय स्थान सांगा? आमचे अन्न सांगा?
ताभ्यो गामानयत्ता अब्रुवन्न वै नोऽयमलमिति ।
ताभ्योऽश्वमानयत्ता अब्रुवन्न वै नोऽयमलमिति ॥2॥
तेव्हा परमात्म्याने गौमाता निर्माण केली आणि हे तुमचे आश्रय स्थान म्हणाले. देवता म्हणाल्या ही ठीकच आहे, पण पर्याप्त नाही. मग परमात्म्याने घोडा निर्माण केला, पण देवतांना तोही पर्याप्त वाटेना.
Aitareya Upanishad-Rig Veda आता ईश्वराने त्या देवतांना आपण निर्माण केलेला पुरुष दाखविला. ते सुंदर रूप देवतांना भावले. मग त्यांनी आपापले स्थान निवडले. अग्नी वाणी रूपात मुखात, वायू नासिकेत प्राण रूपात, सूर्य दृष्टी रूपात नेत्रात, दिशा श्रवण रूपात कानात, औषधी रोम स्पर्श रूपात त्वचेवर, चंद्र मनाच्या रूपात हृदयात, मृत्यू नाभीमध्ये प्राणशक्ती अपान रूपात आणि जल वीर्यरूपात लिंगात समाविष्ट होऊन राहू लागले. हेच तर पिंडात ब्रह्मांड आहे. यावेळी तिथे उपस्थित क्षुधा आणि तृषा म्हणजे तहान-भूक म्हणाल्या, आमचे आश्रयस्थान सांगा? तेव्हा परमात्म्याने त्यांना वरील सर्व देवतात वाटून दिले. ज्या देवतेला जे हविषान्न दिले जाईल त्या चरूमध्ये, हवीमध्ये तुमचाही हिस्सा राहील. जसे डोळ्याला पाहण्याची भूक, कानाला ऐकण्याची भूक इत्यादी. त्यानंतर परमात्म्याने या सर्वांसाठी अन्न उत्पत्ती आणि अन्नरचना केली, पण हे अन्न या निर्माण केलेल्या पुरुषाला पाहून माघारी पळू लागले.
परमात्म्याने अन्नाला बोलावले आणि आदिपुरुषाने त्याला मुखातून ग्रहण करण्याचा प्रयास केला. मुख फक्त अन्नाबद्दल बोलून तृप्त झाले; तद्वतच नाक फक्त अन्नाचे अवघ्राण करून, नेत्र केवळ अन्नाकडे पाहून तर कान फक्त ऐकून, त्वचा केवळ अन्न स्पर्शाने तर हृदय अन्नाच्या केवळ ध्यानाने तृप्त होऊ लागले. मग परमात्म्याने अपानवायू म्हणजे प्राणशक्तीद्वारा मुखाच्या छिद्रातून अन्न ग्रहण करण्याचे विराट पुरुषाला आदेशित केले. प्राणशक्ती अन्नावर निर्भर आहे. म्हणून अपानवायू अन्नग्रहण करणारा आहे. तेव्हा अन्न स्थिरावले. त्यानंतर परमात्मा केसांच्या रंध्रातून विराट पुरुषाच्या आत प्रवेशित झाले. हे परमात्मा जागृती अवस्थेत दक्षिण नेत्रात, स्वप्नावस्थेत मनात आणि सुषुप्तीत हृदयाकाशात राहतात. त्यामुळे हा विराट पुरुष म्हणजे आपला देहच पूर्णब्रह्म वाटू लागला. देवतांच्या वास्तव्यामुळे अवयवांना इंद्रद नाव पडले.
Aitareya Upanishad-Rig Veda पुढे ‘द’ काराचा लोप पावून इंद्र ही देवतांची देवता म्हणून इंद्रिय म्हणतात. हा आत्मा तीन वेळा जन्म घेतो.
तदेतत्सर्वेभ्योऽङ्गेभ्यस्तेजः संभूतमात्मन्येवऽऽत्मानं बिभर्ति तद्यदा स्त्रियां सिञ्चत्यथैनज्जनयति तदस्य प्रथमं जन्म ॥
आईच्या गर्भात सर्वप्रथम आत्म्याचे गर्भाधान होते. म्हणजे तो पुरुष पतिदेव वीर्यरूपाने पत्नीच्या गर्भात स्थापित होतो, त्या पत्नीच्या गर्भात पतिदेवच गर्भरूपात येतात. हा त्या पुरुषाचा पहिला जन्म.
स यत्कुमारं जन्मनोऽग्रेऽधिभावयत्यात्मानमेव तद्भावयत्येषं लोकानां सन्तत्या ।
एवं सन्तता हीमे लोकास्तदस्य द्वितीयं जन्म ॥
आई गर्भात भरणपोषण करते. तो गर्भरूपातला पुरुष वाढतो आणि जन्म घेतो. वडील भरणपोषण करून त्याला स्वतःच्या पायावर उभा करतात हा पुरुषाचा दुसरा जन्म!
सोऽस्यायमात्मा पुण्येभ्यः कर्मभ्यः प्रतिधीयते ।
अथास्यायामितर आत्मा कृतकृत्यो वयोगतः प्रैति ।
स इतः प्रयन्नेव पुनर्जायते तदस्य तृतीयं जन्म ॥4॥
Aitareya Upanishad-Rig Veda आता आपला मुलगा वारसा पुढे नेऊ शकतो ही खात्री झाल्यावर सर्वसंग परित्याग आणि मग मृत्यू. मृत्यूनंतर तो पुन्हा कुठल्या तरी गर्भात जातो हा तिसरा जन्म. पितृशरीरातून पहिला, मातृशरीरातून दुसरा आणि स्वशरीरातून तिसरा जन्म. यानंतर ज्यांचा उद्धार झाला असे वामदेव योगी सांगतात की, हा संसाराच्या वर उठून तो दिव्य लोकात जाऊन अमर होतो आणि संसारात अडकून राहिला तर पुन्हा पुन्हा जन्म घेतो. हा जन्ममरणाचा फेरा चुकावा म्हणूनच हा उपनिषद अभ्यासावा. ऐतरेय उपनिषद सृष्टीच्या उत्पत्तीचा इतिहासच आहे.