महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. 288 जागांसाठी आज मतदान होत आहे. ९ कोटी ७० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे सगळ्याचं लक्ष आहे. असं असताना उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काटेवाडी येथे मतदान केल्यावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केले. अजितदादा म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही सर्व निवडून आलेले आमदार व नेते एकत्र बसून चर्चा करू. या चर्चेतून मुख्यमंत्र्याची निवड करू. लोकसभा निवडणुकीतही आमच्याच कुटुंबातील दोन लोक एकमेकांच्या विरोधात उभे होते. ती निवडणूक सर्वांनी पाहिली आहे. यावेळीही ते घडले आहे, मला विश्वास आहे की, बारामतीची जनता मला विजयी करेल.
यासोबतच खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसंच युगेंद्र पवार यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसंच माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.