अजित पवारांना मोठा धक्का ? रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार ?

सातारा : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागले आहे. यातच अजित पवार गटाचे अनेक नेते आणि आमदार शरद पवार गटाकडे जातानाचे चित्र दिसत आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रा आणि लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. दुसरीकडे पक्षाचे नेते आणि आमदार मात्र एकामागून एक पक्ष सोडून जात आहेत. फलटणमधील अजित पवार गटाचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर हे घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

सातारा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रामराजे नाईक निंबाळकर फलटणमधून विधानसभेसाठी इच्छूक होते. परंतु अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांची उमेदवार जाहीर केल्यामुळे नाराज झालेले रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. कार्यकर्ते जे म्हणतील तो निर्णय घेणार असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे. त्यासाठी ते फलटणमध्ये लवकरच मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

काल इंदापूरमध्ये झालेल्या मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात शरद पवारांनी फलटणमधील १४ तारखेच्या मेळाव्याची माहिती देत रामराजेंच्या प्रवेशाचे संकेत दिले होते. राम राजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत अजित पवार गटाचे सातारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकरही तुतारी हातात घेणार आहेत. १४ तारखेला फलटणमध्ये जाहीर कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडणार आहे.