अजितदादांचे पावसात भिजत भाषण , कार्यकर्त्यांद्वारे जयघोष

बारामती : येथील मिशन हायस्कूल ग्राउंडवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनसन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अचानक पाऊस आल्याने इतर नेत्यांची भाषणे थांबवून अजित पवारांना भाषण करावे लागले. त्यांनी भर पावसात भाषण करत विरोधकांवर हल्ला चढवत अर्थसंकल्पातून घोषित केलेल्या योजना सांगितल्या.

अजित पवारांनी भर पावसात भाषणाला प्रारंभ करताच कार्यकर्त्यांनी डोक्यावर खुर्च्या घेत अजित पवारांच्या नावाचा जयघोष सुरू केला. अजित पवारांनी म्हणाले की, या राज्यातील तब्बल अडीच कोटी सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये तर वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. मी शब्दाचा पक्का आहे. फक्त महिलांसाठीच नाही तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दहा हजार रुपयांचे विद्यावेतन आम्ही सुरू केले. मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केले आहे. हौशे नवशे काहीही सांगतील, त्यांना भुलू नका, दादावर विश्वास आहे म्हणून सांगायचं! आता एवढे केल्यानंतर आमच्यावर टीका केली जाते, परंतु त्या टीकेचा मी विचार करत नाही. आता विधानसभेला महायुतीलाच निवडून द्यायचे आहे. हा अजित दादा शब्द देणारा आहे. एकट्या बारामतीचा विचार केला तरी बारामतीमध्ये १८१ कोटी रुपये वर्षाला येथील महिलांना मिळणार आहेत. आम्ही खोटे बोलणार नाही. सत्ता येते, जाते. इथे कोणी सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. म्हणून सत्ता ही गोरगरिबांच्या हितासाठी राबवायचे असते, असे ते म्हणाले.