Akshay Shinde Encounter : गेल्या वर्षी बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शाळेचा कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या एका प्रकरणाच्या चौकशीसाठी त्याला तळोजा कारागृहातून ठाण्यात आणले जात होते. मात्र मुंब्रा बायपासजवळ त्याचं एन्काऊंटर झालं होतं.
अक्षयच्या एन्काऊंटरवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.त्याचा एन्काऊंटर फेक असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणाची न्यायालयीन चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले होते. याच चौकशी समितीची अहवाल आता मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचा अहवाल ?
अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काऊंटरबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल सोमवारी (20 जानेवारी) मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे न्यायालयात वाचन केले. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे.
अक्षय शिंदे (Akshay Shinde) याला बदलापूरच्या दिशेने नेत असताना त्याने मुंब्रा बायपासनजीक गाडीतच पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली. यामधून त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांन स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र, चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी पोलीस कर्मचारी जबाबदार
या अहवालात म्हटल्याप्रमाणे, अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे रिव्हॉल्व्हरवर आढळून आलेले नाही. मात्र, पोलिसांनी अक्षयने त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केल्याचा दावा केला होता. मात्र, या अहवालामुळे पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे. पोलिसांचा आत्मसंरक्षणासाठी आम्ही अक्षयवर गोळीबार केला हा दावा संशयास्पद असल्याचे अहवालात म्हटले आहे.
अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळावरुन जमा केलेली सामुग्री आणि एफएसएल रिपोर्टनुसार, अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी केलेले आरोप योग्य आहेत. अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी पाच पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे.