Akshay Shinde Encounter : मुंबईतील अक्षय शिंदेच्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात एक खळबळजनक वळण समोर आले आहे. अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात प्रकरण लढवायचं नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार,याप्रकरणात आता यापुढे खटला चालवायचा नसल्याची भूमिका शिंदेच्या आई-वडिलांनी घेतली आहे.
अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठावर एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक विनंती केली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर अक्षय शिंदेचे आई-वडील उपस्थित होते, त्यांनी कोर्टात हात जोडून सांगितले की, “आमच्यावर कोणताही दबाव नाही, मात्र आम्हाला ही धावपळ करणे आता जमत नाही. दररोजच्या धावपळीला आम्ही आता कंटाळलो आहोत.”
हेही वाचा : चोरीच्या 15 दुचाकींसह अट्टल चोर पोलिसांच्या जाळ्यात
त्यांच्या या निवेदनामुळे एक नवीन वळण आलं आहे. कोर्टाने त्यांना यावर स्पष्टीकरण विचारलं आणि त्यावर त्यांनी अशी भूमिका घेतली की, त्यांना आता न्यायालयीन लढाईत भाग घेणे कठीण वाटत आहे. ते म्हणाले की, त्यांची राहण्याची योग्य व्यवस्था नाही, ज्यामुळे आता हि केस आम्हाला लढायची नाही.
काय दिले कारण?
अक्षय शिंदेची आई यांनी न्यायालयाकडे बोलायची परवानगी मागीतली. त्यानंतर कोर्ट रुममधून सगळ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. इन कॅमेरा आरोपीची आईने माहिती दिली. आम्हाला केस लढायची नाही, असे अलका अण्णा शिंदे यांनी कोर्टाकडे विनंती केली.
लोकांचे टॉर्चर खूप होत आहे. आता आम्हाला धावपळ सहन होत नाही. मुलगा तर गेला, अशी बाजू त्यांनी मांडली. त्यावर कोर्टाने तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का, असा सवाल केला. त्यावर आमच्यावर कुणाचा दबाव नाही असे दोघांनी स्पष्ट केले.
अक्षय शिंदेच्या बनावट एन्काऊंटरच्या प्रकरणात पाच पोलिसांवर आरोप असून, त्यांच्यावर काय कारवाई केली आहे, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आजच्या दिवसभराच्या सुनावणीत, उच्च न्यायालयाने या प्रकरणावर चर्चा केली आणि पुढील सुनावणीचे आदेश दिले.
या प्रकरणावर हायकोर्टात उद्या (दि. 07) पुन्हा सुनावणी होणार आहे. यावर काय निर्णय होईल, हे महत्त्वाचं ठरणार आहे. न्यायालय कुटुंबीयांच्या भूमिकेवर काय निर्णय घेईल, तसेच दोषी असलेल्या पोलिसांवर काय कारवाई केली जाईल, हे पुढील काही तासांत स्पष्ट होईल.