Assembly Election 2024 । विधानसभा असो की लोकसभा, निवडणुकीची खरी रंगत ‘गेमचेंजर’ आणि ‘किंगमेकर’ हे जळगावमधूनच ठरतात. त्यामुळे संपूर्ण राज्यासह देशपातळीवरील राष्ट्रीय असो की, राज्यस्तरीय वा अपक्ष या सर्वांचेच लक्ष जळगाव जिल्ह्यावरच केंद्रीत केले जाते. तोडीस तोड उमेदवार देणार यावेळीदेखील जिल्ह्यातील ११ मतदारसंघात कोण कोणाविरूद्ध उभे राहणार याविषयी आडाखे अंदाज व्यक्त केले जात आहेत.
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर त्यांचा पारंपरिक जळगाव ग्रामीण मतदारसंघाऐवजी ग्रामविकास मंत्री महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे संकेत आहेत. यावरून प्रत्येक पक्ष तोडीस तोड उमेदवार देणार असल्याचे दिसून येत आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघ २००९ पर्यंत एरंडोल मतदारसंघ म्हणून प्रचलित होता. या मतदारसंघातील आजी माजी पालकमंत्री गुलाबरावांची काटे की टक्कर सर्वश्रुत आहे.
२००९ नंतर मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतरच्या एरंडोलऐवजी धरणगाव तालुका व जळगाव तालुका मिळून जळगाव ग्रामीण मतदारसंघ तयार झाला. त्यानंतर २००९ च्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांनी गुलाबराव पाटील यांचा अवघ्या ४ हजार ५६२ मतांनी पराभव केला व पालकमंत्री देखील झाले. यानंतरच्या २०१४ च्या निवडणुकीत मात्र गुलाबराव पाटील यांनी ३१ हजारांपेक्षा अधिक मतांनी देवकर यांचा दारूण पराभव केला व नंतर गुलाबराव पाटील सहकार मंत्री तर २०१९ च्या निवडणुकीनंतर पालकमंत्रीदेखील झाले.
यावेळी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतदेखील याच दोन आजी व माजी पालकमंत्र्याच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात यावेळचा आमने-सामने सामना रंगणार असल्याचे चित्र होते. दोन महिन्यापासून जामनेर मतदार संघातून मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात त्यांचेच जुने सहकारी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत मंत्री महाजन यांच्या विरोधात आव्हान उभे करणार असल्याची जोरदार चर्चा होती.
तसेच माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनादेखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमदेवारी देणार असल्याचे जवळजवळ निश्चीत झाले आहे. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून दिलीप खोडपे यांच्याऐवजी ग्रामविकास व पर्यटन विकासमंत्री तथा संकटमोचक गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्त्यातून गुलाबराव देवकर विरोधात उतरणार असल्याची चर्चा आहे.
महाविकास आघाडी महायुती तसेच अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही तिसरी आघाडी तयारीफ करीत उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार वंचित, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गटासह विविध आघाड्यांच्या घटक पक्षांकडून जवळजवळ जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले असून जामनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव निश्चित झाले असल्याचे पुढे येत आहे.