मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक येत्या १२, १३, १४ जुलै रोजी रांची येथे आयोजित करण्यात आली आहे. मे-जूनमध्ये झालेल्या संघाच्या प्रशिक्षण वर्गांच्या मालिकेनंतर या बैठकीला देशभरातील सर्व प्रांत प्रचारक उपस्थित राहणार आहेत. संघाच्या संघटन योजनेत एकूण ४६ प्रांतांची निर्मिती करण्यात आली आहे.
हे वाचलंत का? : भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक : डॉ. मोहनजी भागवत
बैठकीत संघाच्या प्रशिक्षण वर्गाचा अहवाल व आढावा, आगामी वर्षातील योजनेची अंमलबजावणी, सरसंघचालकांचा २०२४-२५ या वर्षाचा प्रवास आराखडा आदी विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच, संघ शताब्दी वर्षासंबंधित विषयांवर बैठकीत विचार विनिमय होतील.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सर्व सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल जी, सी आर मुकुंद जी, अरुण कुमार जी, रामदत्त जी, आलोक कुमार जी, अतुल लिमये जी आणि कार्यकारिणीचे सदस्य या बैठकीत सहभागी होणार आहेत. दि. ८ जुलै रोजी सरसंघचालकांचे रांची येथे आगमन होईल. अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली.