---Advertisement---
निवडणूक आयोग तटस्थ असून कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही. निवडणुका पारदर्शक, कार्यक्षम आणि सुरळीत पद्धतीने घेण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहे. काही आक्षेप आणि समस्या असल्यास तक्रार द्यावी त्याचे निराकरण केले जाईल, विनाकारण आरोप करून आयोगाची बदनामी करू नये अशा शब्दात देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे सुनावले.
कानपूरच्या आर्यनगर स्पोर्ट्स हब येथे रविवारी माथुर वैश्य समाजाने आयोजित केलेल्या पुरस्कार संमारंभासाठी आले असता, ज्ञानेश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी निवडणूक आयोगाच्या तटस्थतेवर भर देताना ते म्हणाले, निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष नाही; तो सर्वांसाठी तटस्थ आहे. निवडणूक आणि मतदार याद्यांसंदर्भात तक्रार असल्यास त्यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना निवदेन द्यावे, त्याचे निराकरण केले जाईल.
हिंसाचाराची घटना खपवून घेणार नाही
बिहारमधील मोकामा हत्याकांडावर बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले, आयोग हिंसाचाराची कोणतीही घटना खपवून घेणार नाही. हिंसा घडविणारे आणि त्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहे. बिहारमध्ये मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी, निवडणूक अधिकारी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यास तयार आहे. मोकामा येथील हत्येनंतर, आयोगाने विधानसभा मतदारसंघात तैनात असलेल्या प्रमुख प्रशासकीय आणि पोलिस अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले. त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात आली.









