तरुण भारत लाईव्ह न्युज : पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ‘न्हाई’कडे हस्तांतरीत करण्यात आला. यासोबतच आर्थिक दुर्बलतेमुळे मनपाकडूनदेखील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरण झाले. महामार्गाचे विस्तारीकरण, सुशोभिकरण तसेच शिवाजीनगर उड्डाणपुलाचेही काम पूर्ण झाले. परंतु जळगाव शहरालगत इच्छादेवी चौफुली ते मू. जे. महाविद्यालय तसेच पुढील भागात सर्व्हिस रस्ते सुस्थितीत करण्याकडे मात्र ‘न्हाई’सह प्रशासनाचे दुर्लक्षच आहे.
जळगाव शहरालगत जाणारा पूर्वीचा जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ‘न्हाई’कडे हस्तांतरीत करण्यात आला. त्यानंतर धुळे विभागांतर्गत तरसोद ते फागणे दरम्यान तसेच शहरालगत तापी महामंडळाजवळील अतिक्रमण काढून इच्छादेवी चौफुली, आकाशवाणी चौक आदी ठिकाणी विस्तारीकरण, सुशोभिकरणाचे काम एका कन्स्ट्रक्शन कंपनीकडून महामार्गाचे काम करण्यात आले. मात्र नशिराबादनजीक टोल असलेला रोड सध्या ‘झक्कास’ असला तरी शहरात वा अन्य परिसरात जाण्यासाठी वाहनधारकांसाठी असलेला सर्व्हिस रोड ‘भकास’ आहे.
इच्छादेवी चौफुलीपासून महामार्गालगत असलेल्या लाडवंजारी मंगल कार्यालय, विश्वप्रभा हॉस्पीटल, राष्ट्रवादी कार्यालय वा त्यापुढे असलेल्या मू. जे. महाविद्यालयाकडे जाण्यासाठी उपयुक्त असलेल्या सर्व्हिस रोड मार्ग दुर्लक्षित आहे. या मार्गाने उखडलेल्या रस्त्यावरून जाताना नागरिकांना प्रचंड धुळीचा त्रास सहन करीत सुमारे 2 ते 4 कि.मी. खड्डेयुक्त रस्त्याने मार्गक्रमण करावे लागत आहे.
तर दुसरीकडे शहरातून जाणारा पूर्वीचा जुन्या महामार्गावरील शिवाजीनगर उड्डाणपूलाचे रेल्वे हद्दीतील नूतनीकरण मध्य रेल्वे विभागाने करून घेतले, तर बाजूचे पिलर्स व भिंतीसह केळकर मार्केटजवळ उतरणार्या उड्डाणपुलाचे काम श्री श्री इन्फ्रा कंपनीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले आहे. मात्र जिल्हा परिषदेलगत आणि श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानालगत दोनही बाजूस असलेल्या सर्व्हिस रस्ता बाकी आहे. सर्व्हिस रोडच्या दुरवस्थेमुळे या परिसरातील लहान दुकानदार व्यावसायिकांसह जळगाव जनता बँक, अत्रे बालमंदिर वा मनपा शाळेकडे कामानिमित्त जाणार्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच काही जणांनी या भागात जणू वाहन तळच केेले असल्याचे लक्षात येते.
आरओबी लगत रस्त्यांची कामे प्रगतीपथावर
शिवाजीनगर परिसराकडील उड्डाण पुलाच्या दुसर्या बाजूचे काम सुरू आहे. टॉवर परिसर जिल्हा परिषदेकडील तसेच शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाकडील असे दोन्ही बाजूच्या समांतर रस्त्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत संबंधित ठेकेदार एजन्सीकडून लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
-सुभाष राऊत, उपविभागीय अभियंता, सा. बां. विभाग, जळगाव.