Amalner Assembly Constituency, दिनेश पालवे : अमळनेर विधानसभा मतदारसंघात मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या निवडणुकीत संपूर्ण प्रचार यंत्रणा त्यांच्या पत्नी जयश्री अनिल पाटील यांनी सांभाळली. अनिल पाटील मंत्री असल्याने तालुक्यात फक्त दोन दिवस त्यांचा प्रवासा असायचा, पण उरलेले सर्व दिवस जयश्री पाटील या कार्यकर्त्यांसह सर्वांच्या भेटीगाठी घ्यायच्या द्वारदर्शन, लग्न, उद्घाटन समारंभ या सर्व ठिकाणी ताईंची हजेरी असायची. निवडणूक काळामध्ये नाराज असलेले सर्व कार्यकर्ते जयश्री पाटील यांनी जोडण्याचे काम केले. ते मंत्री झाल्यानंतर जेवढी विकास कामे सुरू होती त्यांची गुणवत्ता कशी पद्धती चांगली राहील यासाठी अधिकाऱ्यांना त्या सुनावत होत्या. शासकीय योजनांच्या त्या तालुकाप्रमुख असल्याने सर्व शासकीय योजना त्यांनी १०० टक्के कशा पूर्ण होतील याकडे लक्ष घातले. निवडणूक काळात सकाळी सात वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत व संध्याकाळी चार वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत ग्रामीण भागातील सर्व प्रचार यंत्रणा जयश्री पाटील यांनी सांभाळली. याचा सर्व फायदा मंत्री अनिल पाटील यांना झाला.
या निवडणुकीत १२ उमेदवारांनी उमेदवारी केली. त्यात मंत्री अनिल पाटील, शिरीष चौधरी वगळता डॉ. अनिल शिंदेसह सर्व १० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
महा विकास आघाडीच्या बहुतेक नेत्यांच्या गावात मंत्री अनिल पाटील व शिरीष चौधरी यांनी आघाडी घेतली आहे. खासदार स्मिता वाघ यांच्या डांगर गावात अनित पाटील यांना शिरीष चौधरीपेक्षा २१५ मते जास्त आहेत.
माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या राजवड गावात मंत्री अनिल पाटील यांना इतर उमेदवारांपेक्षा ५७१ मते जास्त आहेत. माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील व बाजार समिती माजी सभापती प्रफुल पाटील यांच्या मालपूर गावाला मंत्री अनिल पाटील यांना इतर उमेदवारांपेक्षा १०९ मते जास्त आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांच्या खवशी गावात इतरउमेदवारांपेक्षा मंत्री ४७० मते जास्त आहेत.
शिवसेना उबाठाच्या नेत्या अॅड ललिता पाटील यांच्या बामणे गावाला इतर उम दवारांपेक्षा मंत्री अनिल पाटील यांना ३०१ मते जास्त आहेत. शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील यांच्या मंगरूळ गावाला इतर उमेदवारांपेक्षा मंत्री अनिल पाटील यांना १७९१ मते जास्त आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (एस पी) चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्या रंजाणे गावात मंत्री अनिल पाटील यांना इतरांपेक्षा १७५ मते जास्त आहेत. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील यांच्या गडखांब गावात डॉ. शिंदे यांना ८३, अनिल पाटील यांना इतर उमेदवारांपेक्षा ७५५मते जास्त आहेत. काँग्रेस नेते धनगर पाटील यांच्या गावात मंत्री अनिल पाटील यांना इतरांपेक्षा ५०० मते जास्त आहेत.
किसान काँग्रेसचे कार्यध्यक्ष शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या तिलोत्तमा पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे यांच्या शिरूड गावाला मंत्री अनिल पाटील यांना इतर उमेदवारां पेक्षा ६०० मते जास्त आहेत. शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांच्या कंडारी गावाला अनिल मंत्री पाटील यांना इतरांपेक्षा ६४ मते कमी आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या पिंपळकोठा गावात मंत्री अनिल पाटील यांना इतरांपेक्षा ५० मते कमी आहेत.
अनिल पाटील यांना त्यांच्या गावात इतरांपेक्षा १०० मते जास्त आहेत. डॉ. अनिल शिंदे याना त्यांच्या पिळोदा गावात मंत्री अनिल पाटील यांना इतरांपेक्षा १७९ मते जास्त आहेत. डॉ शिंदे यांना सुंदरपट्टी व हिंगोणे खुर्द प्र. अमळनेर येथे शून्य मते मिळाली आहेत. सर्वाधिक ७० ‘नोटा’ मते तांदळी गावाने दिली. एकूण १३२९ नोटा होते. पोस्टल बॅलेटमध्ये १९४ मते रिजेक्ट झाली आहेत. ४ मते प्रदत्त झाली. अनिल पाटलांनी एकूण मतदानाच्या ५३.५ टक्के मतदान घेतले. शिरीष चौधरी यांनी ३७.१६ टक्के मते घेतली. अनिल शिंदे यांनी ६.७४ टक्के मते घेतली. इतर उमेदवार १ टक्क्यांपेक्षा खाली राहिले. म्हणजेच विधानसभा निवडणुकीत महा विकास आघाडीच्या नेत्यांच्या गावात मंत्री यांना आघाडी आहे.
मंत्री पाटील यांनी शरद पवारांचे विधान ठरवले खोटे
ते यापुढे निवडून येणार नाहीत. याची काळजी आम्ही घेऊ, असे उद्गार शरद पवार यांनी मंत्री अनिल पाटील यांच्याविषयी काढले होते. मात्र खुद्द मोठ्या पवारांच्या विधानाला खोटे ठरवत मंत्री पाटील यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. योग्य वेळी योग्य मोहरे वापरत विरोधात वक्तव्य करत शड्डू ठोकणाऱ्या माजी आमदार साहेबराव पाटील यांनाही जवळ केले. तसेच निधी वाटपातही हात आखडता न घेता कोणत्याही प्रकारचा भेदभाव न केल्याने मतदारांनीही मोठा प्रतिसाद त्यांना दिला. एकंदरीत, सूक्ष्म नियोजन केल्याने मंत्री अनिल पाटील यांच्या गळ्ळ्यात पुन्हा विजयाची माळ पडली आहे.