अमळनेर : आईने बाजारात सोबत नेले नाही या क्षुल्लक करणापोटी १४ वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पिळोदे येथे गुरुवार १२ सप्टेंबरला घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माया सुधाकर कोळी (वय १४, रा. पिळोदे ता. अमळनेर) असे मयत तरुणीचे नाव आहे.
माया हि आपल्या कुटुंबासह राहत होती. गुरुवारी, तिची आई मालुबाई सुधाकर कोळी ह्या अमळनेर येथे बाजार जाणार होत्या. त्यावेळी त्यांची मुलगी माया हीने सोबत येण्याचा हट्ट केला. मात्र, मालुबाई यांनी तिला त्यास नकार दिल्याने माया हिने रागात घराचा दरवाजा आतून लावून घेतला होता. मालूबाई ह्या बाजार करून आल्यानंतर माया हिने साडीच्या सहाय्याने लाकडी सऱ्याला गळफास घेतल्याचे दिसून आले.
ग्रामस्थांच्या मदतीने मायाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ गणेश पाटील हे करीत आहेत.