‘या’ शहरवासीयांना पुढील वर्षांपासून जादा कर आकारणीचा भूर्दंड

अमळनेर : नगरपरीषदेने सन २०२३-२४ वर्षाचा २६३ कोटी ९ लाख ७० हजारांचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला असून शहरवासीयांना आठवडाभर २४ तास पाणीपुरवठा होण्यासाठी ८० कोटींची तरतूद केली आहे. मंगळवार, २८ फेब्रुवारी रोजी नगरपालिकेच्या सभागृहात अंदाजपत्रकीय प्रशासकीय सभा नगरपरीषद प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत पार पडली. लेखापाल चेतन गडकर यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले आणि सदर सभेपुढे २६३ कोटी ०९ लाख ७० हजाराचे अंदाजपत्रक सादर करण्यात आल्यानंतर त्यास मंजुरी प्रदान करण्यात आली.

शिलकी अंदाजपत्रक सादरमहसुली व भांडवली जमा-खर्चाचे अंदाजपत्रक प्रारंभीक व अंतिम शिलकीसह सादर करण्यात आले असून ते २७ लाख ३३ ने शिल्लकी असून यात रोख स्वरूपात तीन लाख २८ व बँकेतील विविध खात्यातील शिल्लक २४ लाख पाच हजार दर्शवण्यात आली आहे. अंदाजपत्रकात कायद्यातील तरतूद व शासन निर्देशानुसार दुर्बल घटक कल्याण निधी ९० लाख, अपंग कल्याण निधी १५ लाख व महिला व बाल कल्याण विकास निधी १५ लाख असून या कल्याणकारी योजनांवर विशेष तरतूद करण्यात आली आहे. शासन निर्देशानुसार आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ साजरे करण्यासाठी १० लाखांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.

न.पा.चे व्यापारी संकुलाचे लिलावाद्वारे उत्पन्नात भरीव वाढ करण्याचे प्रयोजन आहे. सर्व मालमत्ताचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू असून त्यानुसार पुढील वर्षापासून कर आकारणी केली जाणार आहे. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी संदीप गायकवाड, अभियंता अमोल भामरे, दिगंबर वाघ, संदीप पाटील, अभियंता सत्येम पाटील, युवराज चव्हाण, संतोष बिर्‍हाडे, विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर, डॉ.विलास महाजन, संजय चौधरी आदी उपस्थित होते.