तरुण भारत : बाबा अमरनाथ यांचे दर्शन हे डोळयांचे पारणे फेडते. त्यांच्या दर्शनाची सगळ्या भक्तना आस लागलेली असते. पण मुसळधार पावसामुळे शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही काश्मीरमधील अनेक भागात पाऊस सुरू असल्याने स्थगित करण्यात आली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. “खराब हवामानामुळे पहलगाम आणि बालटाल – या दोन्ही मार्गांवर सलग दुसऱ्या दिवशी यात्रा थांबवण्यात आली. शनिवारी सकाळी कोणत्याही भाविकांना अमरनाथ गुहेच्या दिशेने जाण्यास परवानगी नव्हती. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,
श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यामुळे यात्रेकरूंच्या ताज्या तुकडीला जम्मूहून पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. पावसामुळे दरड कोसळल्याने महामार्ग ठप्प झाला आहे. तत्पूर्वी, शुक्रवारी देखील काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे अमरनाथ यात्रा दोन्ही मार्गांवर थांबवण्यात आली होती आणि यात्रेकरूंना बालटाल आणि नूनवान बेस कॅम्पवर थांबवण्यात आले होते.
यात्रेच्या बालटाल मार्गावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळली होती. मात्र, या काळात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. यात्रेचे स्थगिती आणि खोऱ्यातील खराब हवामानामुळे शनिवारी सकाळी भगवती नगर बेस कॅम्पवरून यात्रेच्या कोणत्याही ताज्या तुकडीला पुढे जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. यात्रेकरूंचा जत्था चंदरकोट येथे थांबवण्यात आला होता. पहलगाम बेस कॅम्पवर गर्दी टाळण्यासाठी रामबन जिल्ह्यातील महामार्ग शुक्रवारी तात्पुरता बंद करण्यात आला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व यात्रेकरू सुरक्षित असून मार्गात आश्रय घेत आहेत. हवामान सुधारल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले. हवामान खात्याने रविवारपर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये मान्सून वारे आणि पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावाखाली मध्यम ते जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.