---Advertisement---
---Advertisement---
काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे बुधवारी अधिकाऱ्यांनी पहलगाम आणि बालटाल दोन्ही मार्गावरील अमरनाथ यात्रा स्थगित केली, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पहलगाम आणि बालटाल बेस कॅम्पवरून ३० जुलैला अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे, अशी पोस्ट जम्मू-काश्मीरच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने त्यांच्या ‘एक्स’वर केली.
बुधवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बालटाल आणि नुनवान/चंदनवारी बेस कॅम्पवरून यात्रेला परवानगी देण्यात आली नाही. आतापर्यंत ३.९३ लाखांहून अधिक यात्रेकरूंनी पवित्र गुहेत दर्शन घेतले आहे. गुरुवारी भगवती नगर बेस कॅम्पवरून ही यात्रा स्थगित राहील.
यात्रा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे, बेस कॅम्पमधून येणाऱ्या यात्रेकरूंच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे, ३१ जुलै २०२५ रोजी भगवती नगर जम्मूहून बालटाल आणि नुनवान बेस कॅम्पकडे कोणत्याही काफिल्याला जाऊ दिले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे, असे काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी सांगितले.
यात्रा यावर्षी ३ जुलैला सुरू झाली असून, ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन दिवशी समाप्त होणार आहे. यंदा आतापर्यंत जवळपास चार लाखांहून अधिक भाविकांनी अमरनाथ गुहेचे दर्शन घेतले आहे. याआधी देखील १७ जुलै रोजी खराब हवामानामुळे यात्रा थांबवण्यात आली होती. पावसामुळे रस्ते आणि ट्रॅक स्लिप होण्याचा धोका असल्याने भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.