रुग्णवाहिकेच्या धडकेत कुसुंबा येथील महिलेचा मृत्यू

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव :  वेगाने जाणार्‍या रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली. ही घटना शुक्रवार, ५ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेदरम्यान कुसुंबा गावाजवळ घडली. यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

सविस्तर माहिती अशी की, कुसुंबा, ता.जळगाव येथील रहिवासी कैलास आनंदा पाटील हे आजारी असल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कैलास पाटील यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी संगीता कैलास पाटील वय ४८ वर्षे, मुलगा शुभम आणि त्यांच्या आई इंदूबाई आनंदा पाटील कुसुंबा येथून शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास निघाले होते.

दरम्यान त्यावेळी कुसुंबा गावातून भरधाव वेगाने येणारी रुग्णवाहिका क्रमांक एमएच १९ सीवाय ७०११ ने संगीता कैलास पाटील यांना जोरदार धडक दिली. या धडकेत संगीता पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर त्याच रूग्णवाहिकेतून संगीता पाटील यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी यांनी संगीता पाटील यांना मयत घोषित केले. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.