---Advertisement---
अमेरिकेच्या चुकीमुळेच दहशतवाद्यांना प्रोत्साहन मिळाले, यामुळे पाकिस्तानच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढ झाली आहे. अफगाणिस्तानातून बाहेर पडताना अमेरिकी लष्कराने मागे सोडलेल्या शस्त्रांमुळे अतिरेक्यांना बळ मिळाले आणि त्यांची संघर्ष करण्याची ताकद वाढत्याचा आरोप पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांनी केला.
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या बिलावल यांनी सोमवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, जगात कुठल्याही देशाच्या तुलनेत पाकिस्तान दहशतवादाचा बळी ठरला आहे. या संघर्षात आम्ही ६० हजारांपेक्षा अधिक नागरिक गमावले, तर अब्जावधींच्या मालमतांचे नुकसान झाले.
आजही आमच्या देशातील नागरिक दहशतीत जगत आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिकेची चूक जबाबदार आहे. अमेरिकेच्या लष्कराने त्यांची शस्त्रे अफगाणिस्तानात सोडली नसती तर, आज परिस्थिती वेगळी राहिली असती. अमेरिकेच्या शस्त्रांमुळे दहशतवाद्यांना बळ मिळाले, ज्यामुळे पाकिस्तानच्या समस्या वाढल्या आहे. भुट्टो यांनी यावेळी अमेरिकेवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला.
पाकिस्तानात अंतर्गत सुरक्षेचे आव्हान
अमेरिकेच्या शस्त्रांचा वापर अतिरेकी हल्ला करण्यासाठी करतात, त्यामुळे पाकिस्तानात अंतर्गत सुरक्षेचे आव्हान वाढले आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या मुद्यांवर बोलत आहोत, मात्र दुर्दैवाने याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाकिस्तानच्या हद्दीत दहशतवादी गटांशी लढतो तेव्हा त्यांच्याकडे असलेली शस्त्रे आपल्या सुरक्षा दलांच्या शस्त्रांपेक्षा कितीतरी पटीने आधुनिक आहे. ही शस्त्रे अमेरिकेने अफगाणिस्तानात सोडली होती. आपल्याला प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवावे लागेल. आम्ही दहशतवादाविरोधात भारताला सहकार्य करण्यास तयार आहोत, असे भुट्टो म्हणाले.