अमित शाह यांचे एसआयआर मुद्द्यावरून विरोधकांवर टीकास्त्र

---Advertisement---

सीतामढी : बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष फेरपडताळणीवर (एसआयआर) आक्षेप घेणाऱ्या विरोधकांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस नेते राहुल गांधी राज्यात ‘एसआयआर’च्या मुद्द्यावरून राजकारण करत आहेत. परंतु घुसखोरांना मतदानाचा कुठलाही अधिकार नसल्याचे शाह यांनी म्हटले. काँग्रेस आणि राजदप्रमुख लालूप्रसाद यादव व त्यांचे सहकारी ऑपरेशन सिंदूरला संसदेत विरोध करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बिहारच्या सीतामढी येथे माता जानकीचे जन्मस्थळ मानल्या जाणाऱ्या पुनौरा धाम मंदिराच्या पुनर्विकासाचे भूमिपूजून अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी आयोजित सभेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. बिहारमध्ये पुन्हा एनडीएची सत्ता येण्याचा विश्वास व्यक्त करत अमित शाह म्हणाले की, घुसखोरांची नावे मतदार यादीतून हटवली पाहिजे.

त्यांना मतदान करण्याचा कुठलाही अधिकार नाही. मात्र घुसखोरांची नावे मतदार यादीतून वगळली जात असल्याने राज्यात राजद आणि काँग्रेसकडून एसआयआरला विरोध केला जात आहे, अशी टीका शाह यांनी केली. ऑपरेशन सिंदूर हाताळण्यावरून सरकारवर होत असलेल्या टीकेला शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात देशात सातत्याने दहशतवादी हल्ले होत होते. परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तेत वेगळा भारत आहे. आपले सैनिक दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारत आहेत. पण राजद आणि काँग्रेस नेते ऑपरेशन सिंदूरचा विरोध करत असल्याचे शाह म्हणाले. राजदने आपल्या सत्ताकाळात बिहारमध्ये काहीही केले नाही. सत्ताकाळात त्यांनी फक्त ‘गुंडागर्दी’ला चालना दिल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रीय मंत्री म्हणून लालूंनी राज्यातील रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी फक्त १,१३२ कोटी रुपये मंजूर केले. तर मोदी सरकारने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी १०,०६६ कोटी रुपये दिल्याचा दावा शाह यांनी केला. तसेच सीतामातेच्या जीवनाचे महत्त्व अधोरेखित करत शाह यांनी मिथिलांचलची संस्कृती संपूर्ण भारतीय संस्कृतीचा महत्त्वपूर्ण दागिना असल्याचे म्हटले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---