बिजापूर (छत्तीसगड) : बिजापूर जिल्ह्यात आज (दि. ९) महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार केले आहे, तर दोन जवान शहीद झाले आहेत. अन्य दोन जवान गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
चकमकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी साेशल मीडिया प्वर पाेस्ट करत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देत केंद्र सरकारच्या भूमिकेवर स्पष्टता दिली. त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले की, “नक्षलमुक्त भारताच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. मात्र, आपण आपल्या दोन शूर जवानांना गमावले आहे, याचे दुःख आहे. देश त्यांचा सदैव ऋणी राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.”
गृहमंत्र्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत नक्षलवाद नष्ट करण्याच्या संकल्पावरही भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, “३१ मार्च २०२६ पूर्वी देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यात येईल, जेणेकरून कोणत्याही नागरिकाला त्याचा त्रास सहन करावा लागणार नाही.”