अमृत महाआवास अभियान सर्वांसाठी घरे – 2024 अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात

तरुण भारत लाईव्ह न्युज : स्वत:चे पक्के घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. घरकुलाच्या माध्यमातून हजारो ग्रामीण कुटुंबाचे हे स्वप्न पूर्ण होत आहे. बेघर आणि गरीब कुटुंबांना घरकुल बांधून देण्याची महत्वाची जबाबदारी आपल्यावर आहे. जबाबदारी ही संधी समजून प्रत्येकाने आत्मीयतेने काम केल्यास 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण होईल. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील नवीन पाणीपुरवठा योजना व रेट्रो फिटिंगची एकूण 1357 कोटी निधीच्या 1394 योजनांना प्रशाकीय मान्यता देऊन 100 टक्के योजनांचे टेंडर काढण्यात आले आहे.

घरकुल लाभार्थ्यांना तत्परतेने नळ जोडणी नोदणी करण्याची यंत्रणांनी दक्षता घेण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
तर दीनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत जागा खरेदी अर्थसहाय्य यांची मर्यादा 50 हजारावरून एक लाख रुपये करण्याबाबत शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. तसेच बहुमजली इमारतचे प्रकल्प राबवून लाभार्थ्यांना घरकुल मिळवून देण्याकरिता शासकीय यंत्रणांनी प्रयत्नशील राहावे. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून घरकुल बांधकामास गतिमान व गुणवत्तापूर्वक राबविण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. अमृत महाआवास अभियान 2022-23 अंतर्गत नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यात 20 नोव्हेंबर 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत अमृत महाआवास अभियान 2022-23 राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व मंत्री महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. प्रारंभी प्रकल्प संचालक मिलन कुटे यांनी अमृत महाआवास अभियान 3.0 चे विस्तारित सादरीकरण केले. अडावद, ता. चोपडा येथे गृहसंकुल उभारल्याचे नमूद केले. जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीतील भूमिहीन लाभार्थ्यांची संख्या 18843 होती.त्यापैकी तब्बल 13842 भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध केल्याबद्दल मान्यवरांनी अधिकारी व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

यांची होती उपस्थिती

जिल्हा नियोजन समिती सभागृहात शनिवारी झालेल्या एक दिवसीय कार्यशाळेला आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण, प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मिनल कुटे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहल कुडचे, प्रांताधिकारी विनय गोसावी, विभागीय कार्यालयाचे प्रतिनिधी ओवेस सिद्दीकी यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन राजेंद्र इंगळे यांनी, तर आभार कनिष्ठ लिपिक किरण बेडीसकर यांनी मानले.

जिल्हास्तरीय प्रधानमंत्री आवास योजना पुरस्कार वितरण

सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कार- प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे पारोळा, भडगाव व मुक्ताईनगर गटविकास अधिकारी, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार – प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे कुर्‍हे पानाचे, ता. भुसावळ, सारोळे खुर्द, ता. अमळनेर व मनवेल, ता. यावल सरपंच व ग्रामसेवक, सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्कार – प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे अडावद, ता. चोपडा, ऐनपूर खिरवड, ता. रावेर, तळेगाव, ता. जामनेर. गटविकास अधिकारी, जिल्हास्तरीय राज्य पुरस्कृत आवास योजना पुरस्कार वितरण –
सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कार – प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे जामनेर, एरंडोल व पाचोरा गटविकास अधिकारी, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार – प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे करंजी, ता.बोदवड , कासोदा, ता. एरंडोल व करंज, ता. जळगाव सरपंच व ग्रामसेवक, सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्कार- प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे पाळधी खुर्द, ता.धरणगाव, पहूर पेठ ता. जामनेर व बामरुड, ता. पाचोरा सरपंच व ग्रामसेवक.

गृहप्रवेश व प्रकाशन

अपंग व्यक्तींना चोरगाव, ता. धरणगाव येथील दिव्यांग बुधा सोनवणे, पाळधी खुर्द, ता. धरणगाव, कोकिळा लक्ष्मण परदेशी, भालोद, ता. यावल येथील महेरबान कुरबान तडवी यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलाची चावी देऊन गृहप्रवेश करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते अमृत महाआवास अभियान यशोगाथेचे प्रकाशन करण्यात आले.