जळगाव : शॉर्ट सर्किटमुळे ‘समर एजन्सी’ या इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग लागली. यात कुलर, फ्रिजसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाले असून सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
शहरातील शिवतीर्थ मैदानासमोर समर एजन्सी इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. या दुकानाला गुरुवारी मध्यरात्री अचानक शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. याबाबत माहिती मिळताच जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाच्या तब्बल आठ ते दहा बंबांच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांना तब्बल चार ते पाच तास लागले. अखेर पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
या आगीत दुकानातील लाखो रुपयांची इलेक्ट्रॉनिक उत्पादने, विशेषतः नवीन कुलर, फ्रिज, पंखे, मिक्सर, ग्राइंडर इत्यादी संपूर्णपणे नष्ट झाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दुकानमालक संकटात
मात्र एवढ्या मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे दुकानमालक संकटात सापडला आहे. दुकानमालकाने शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली असून, आग लागण्यामागील नेमका कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.