जळगाव : जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मामाने नऊ वर्षीय भाचीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी मामाविरोधात गुन्ह्या दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
बहिणीकडे आलेल्या भावाने सॅंडल घेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन भाचीला सोबत नेले. तिला शेतात घेऊन गेल्यावर विनयभंग केला. सुदैवाने गुड टच बॅड टचचे ज्ञान असल्याने मामा बॅड टच करत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने मामाच्या तावडीतून सुटका करुन घेत शेजारी काम करणाऱ्या महिलांना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी नराधम मामाला पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
तो जळगाव जिल्ह्यात एका गावात राहणाऱ्या बहिणीच्या घरी आला होता. त्याने बहिणीला सांगितले की, भाचीला सोबत घेऊन जात आहे. तिला सॅंडल घेऊन देतो. त्यानंतर बराच वेळ मुलगी घरी परत न आल्यामुळे आईला चिंता लागली होती. तेव्हा परिसरातील एका शेतात काम करणाऱ्यांनी वाईट कृत्य करणाऱ्या मामाला पकडून ठेवल्याचे व पीडित बालिका रडत असल्याची माहिती मिळाली. शेताकडे बालिकेच्या कुटुंबीयांनी तत्काळ धाव घेतली त्यानंतर झालेला प्रकार लक्षात येताच आईने मुलीला कवटाळून तिला धीर दिला.
दरम्यान, मारहाणीत जखमी झालेल्या मामाला उपचारार्थ धुळे येथे सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथून सुटी होताच त्याला पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात ‘पोस्को’ कायद्यासह इतर विविध कलमान्वये संशयिता विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी पुढील तपास करीत आहेत.