भुसावळ / धुळे : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोघा भावंडांचा पांझरा नदीवरील बंधाऱ्यात बुडाल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवार, १७ रोजी सायंकाळी बिलाडी, ता.धुळे येथे घडली. या घटनेत एक जण सुदैवाने बचावला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे. चैतन्य सुनील पाटील (२२) आणि लोकेश सुनील पाटील (१९, वारे नगर, बिलाडी रोड, धुळे) अशी मयतांची नावे आहेत.
पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू
पाटील भावंडे श्री विसर्जनासाठी बिलाडीजवळील पांझरा नदीवरील बंधाऱ्यावर आले असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाली तर त्यांच्यासोबतच्या एका मित्राला वाचवण्यात यश आले. दोघांचे पार्थिव शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. या दुर्दैवी घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात आली. मयत भावंडे धुळ्यातील जयहिंद वरिष्ठ महाविद्यालय रस्त्यावरील एकविरा मोबाईल शॉपचे संचालक सुनीप्ल पाटील व भाजप मंडळाध्यक्ष छाया पाटील यांची मुले आहेत. धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.