आनंदाची बातमी, केंद्राकडून तरुणांना मिळणार रोजगाराच्या सुवर्ण संधी…

नवी दिल्ली : रोजगार मेळ्याचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी देशातील 70 हजारांवर तरुणांना केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये नोकर्‍या देणार आहेत. यावेळी ते आभासी माध्यमातून या सर्व तरुणांना मार्गदर्शनही करणार आहेत. देशातील 44 ठिकाणी एकाचवेळी या रोजगार मेळ्याचे आयोजन केले जाणार आहे. तरुणांसाठी ही खूप मोठी संधी आहे.

 

केंद्रीय कार्यालयांसोबतच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही या नियुक्त्या करण्यात येणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनातून दिली. 70 हजारांवर तरुणांना नियुक्तिपत्रे देण्याचा हा कार्यक्रम शनिवारी सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. महसूल विभाग, वित्तीय सेवा विभाग, टपाल खाते, शालेय आणि उच्च शिक्षण विभाग, संरक्षण खाते, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, जलस्रोत, कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालय तसेच गृह मंत्रालयात या नियुक्त्या केल्या जाणार आहेत, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.