आखाती देश ओमानच्या मस्कत मधील प्राचीन “मोतीश्र्वर शिव मंदिर”

तरुण भारत लाईव्ह न्यूज । प्रा. डॉ. अरुणा धाडे । 

बारा ज्योतिर्लिंगाशिवाय ही ज्योतिर्लिंग असू शकतात का ? असतील तर कुठे असतील ? देशात कि देशाबाहेर, कोणास ठावूक!

एक प्राचीन शिव मंदिर आखाती देश ‘ओमान’ च्या “मस्कत” शहरात आहे. संभवतः पर्शिअन क्षेत्रातील हे एकमेव प्राचीन मंदिर असावे जिथे आजही पूजाअर्चना केली जाते.

इस्लामिक देशात “मंदिर बघण्याचा” योग आला तर कसे वाटेल? असेच काही घडले होते जेव्हा ओमानच्या “सुक”मध्ये (म्हणजे बाजारात) फिरताना, “आम्ही भारतीय आहोत” हे ओळखून तिथला दुकानदार म्हणाला “तुम्ही इथल्या “मोतीश्वर महादेव मंदिरी” गेलात कि नाही”? पहिल्या प्रथम इथे मंदिर असू शकतं याचंच घोर आश्चर्य वाटलं! मग काय सरळ कॅब पकडून मंदिर गाठलं!

मंदिराबाहेर दूध, नारळ, तेल विकायला होतं. तेल का विकायला आहे? याचा संदर्भ काही कळला नाही. आत गेल्यावर नीटनेटके, स्वच्छ, सुंदर मंदिर दृष्टीस पडले. वातावरणात धूप, अगरबत्तीचा दरवळ होता. “स्थानिक”दर्शनासाठी येत, जात होते.

“शिवमंदिर” इथे कसे? त्या मागचा इतिहास काय?  हे जाणून घेण्याची उत्सुकता लागून होती. म्हणून लागलीच मंदिराच्या पुजाऱ्यांना गाठले. मंदिराचा रंजक इतिहास सांगताना पुजारी ४०० वर्षे मागे घेवून गेले. संपन्न व्यापारउदिमचा “बहर” असलेल्या भारतात !

भारताच्या गुजरात प्रांतातील कच्छ भागाचे व्यापारी व्यापारा निमित्त इथे येत जात असतं. पुढे १५ व्या शतका दरम्यान ते ह्या भूभागात स्थायिक झालेत. धनसंपन्न होते! प्रदेशावर त्यांचं वर्चस्व होतं. एकदा “राजपॅलेस” परिसरात त्यांना “शिवलिंग” सापडलं. ऐतिहासिक उल्लेखानुसार त्यावेळच्या सुलतानाच्या परवानगीने ते शिवलिंग पॅलेस मधून काढून, मंदिर बांधून त्यात स्थापित केलं गेेलं. तेच हे “मोतीश्र्वर शिव मंदिर” स्वयंभू शिवलिंग असलेले!

वेळोवेळो मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असला तरी अलीकडचे सर्वसुविधायुक्त स्वरूप १९९९ साली करण्यात आलेल्या नवीनीकरणामुळे आहे. ह्या मंदिर प्रांगणात दोन मंदिरे आहेत. एक ‘आदी मोतीश्वर मंदिर’ जिथे प्राचीन शिवलिंग आहे, दुसरे आताचे ‘महादेव मोतीश्वर मंदिर’.

मंदिर प्रांगणातच हनुमानाचे छोटेखानी सुंदर मंदिर दिसले आणि मंदिराबाहेर विकायला असणाऱ्या तेलाचा संदर्भ लागला !

मंदिराचं व्यवस्थापन इथल्या मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या “मंदिर व्यवस्थापन कमिटी” द्वारे बघितले जाते.  तीन पुजारी आणि प्रशासनिक सेवकां करावी मंदिरातील नित्याच्या पूजाविधी पार पाडल्या जातात.

देवाधिदेव महादेवाचा खास उत्सव  ‘महाशिवरात्री’ साजरा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने स्थानिकच   नाही तर इतर आखाती देशातूनही भक्त येतात.  विशेष म्हणजे वर्ष २०१८ मध्ये भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सुद्धा महाशिवरात्रीच्या उत्सवात सहभागी झाले होते. या शिवाय वसंत पंचमी, हनुमान जयंती, रामनवमी, गणेश चतुर्थी, श्रावण सोमवार सुद्धा साजरे केले जातात.

ओमान वाळवंटी भूप्रदेश आहे. वर्षातील बहुतांश महिने भीषण गर्मी असते. पाण्याचं दुर्भिक्ष्य असतं! अशा विपरीत परिस्थितीत एक विलक्षण गोष्ट ह्या मंदिराच्या बाबतीत सांगतात. ह्या मंदिर परिसरात  एक “प्राचीन विहीर” आहे. बाहेर कितीही भीषणता असली तरी, आजपर्यंत ही विहीर कधीही कोरडी पडलेली नाही. आजूबाजूचे पाण्याचे स्रोत संपतात पण ही एकमात्र विहीर अविरत थंड, निर्मळ जल देत असते.

|| जटाटवीगलज्जल प्रवाहपावितस्थलेI

गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकाम् ||