जळगाव : पर्सनल लोनच्या बहाण्याने एका तरुणाची ७ लाख ६० हजार रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनुसार, अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील मूळ रहिवासी मिलिंद प्रकाश पाटील (वय २३) हा तरुण सद्य:स्थितीत पुण्यातील हिंजवडी येथे वास्तव्यास आहे. मिलिंद यास त्याच्या मोबाईलवर १८ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोनवर बोलणाऱ्या संबंधित व्यक्तीने मिलिंद यास पर्सनल लोन तसेच क्रेडीट कार्डच्या वेगवेगळया ऑफरबद्दल माहिती देत मिलिंद याचा विश्वास संपादन केला.
यादरम्यानच त्याला ओटीपी पाठवून तो विचारला. मिलिंद याने ओटीपी सांगितल्यावर या ओटीपीच्या आधारावर संबंधितांनी मिलिंद याच्या बँक खात्यातील तब्बल ७ लाख ६० एवढी रक्कम दुसऱ्या बँक खात्यावर ट्रान्स्फर करुन घेतली. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर मिलिंद पाटील याने शुक्रवारी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे हे करत आहेत.