तरुण भारत लाईव्ह । १६ जानेवारी २०२३। एका उद्योजकाला सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून महाराष्ट्रात प्रकल्प स्थापन करायचा होता. मात्र धमक्या आणि खंडणी मागणारे दूरधवनी आल्यानंतर त्याने हा प्रकल्प कर्नाटकात हलवला, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
गृहमंत्रालयाची जबाबदारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांना त्रस्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशा सूचनाही दिल्या. मला महाराष्ट्रात सहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प उभारायचा होता, पण धमक्या आणि खंडणीची मागणी करणारे दूरध्वनी आल्यानंतर प्रकल्प कर्नाटकात हलवला असे एका उद्योजकाने सांगितल्यानंतर मला वाईट वाटले. हि परिस्थिती अशीच राहिली तर राज्यातील युवकांना रोजगार मिळणे कठीण होईल. अशा प्रकारच्या प्रवुत्तीला ठेचावेच लागेल.उद्योजकांना त्रास देणाऱ्या त्यांचा पक्ष, संघटना, समुदाय, धर्माचा विचार न करता कठोर कारवाई करा, असा निर्देश पोलिसांना दिला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
यात अपयशी ठरणाऱ्या पोलिसांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ असल्याने गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येत आहेत. उद्योगांमध्ये राजकारण करू नका, अशी विनंती मी नेत्यांना करेल. मजुरांना संरक्षण मिळायला हवे. पण जर काही राजकीय नेते मजुरांच्या खांद्याचा वापर करून पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत असतील तर, मी कारवाई करण्यास मागे हटणार नाही, असे ते म्हणाले.