जळगाव : जिल्ह्यातील पशुगणना अंतिम टप्प्यात असून, १ हजार ४६८ गावांमध्ये २१व्या पशुगणना म ोहीमेंतर्गत १० लाख १० हजार १७३ पशुधन गणना पूर्ण झाली आहे, तसेच ५ तालुक्यांमधील ३७ गावांमधील पशुगणनेचे काम सुरू असून दुसऱ्यांदा १५ एप्रिलपर्यंत पशुगणना कामासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या वतीने दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते. आतापर्यंत २० पशुगणना झाल्या असून या वर्षी प्रगणकांद्वारे मोबाइल अॅपच्या माध्यमातून प्रथमच ऑनलाइन पशुगणना केली जात आहे. राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर कौटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या गाय, बैल, म्हैस, रेडे, शेळी, मेंढी, घोडा, गाढव, कुत्रा, मांजर, वराह आदी पशुधनाच्या १६ प्रजाती व कुक्कुट पक्ष्यांची जातीनिहाय, वयोगट, तसेच लिंगनिहाय पशुगणना केली जात आहे.

देशभरातील २१ व्या पशुगणनेत काही पशुधनाची प्रथमच गणना होत आहे. त्यातच शासनाच्या निर्णयानुसार २५ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पशुगणना करण्यात येणार होती. परंतु, महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीची आचारसंहिता लागू असल्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर पशुगणनेला सुरुवात झाली. तसेच ३१ मार्चअखेर एक महिन्याची मुदतवाढही देण्यात आली होती. दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये पशुगणना अत्यंत धीम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा १५ एप्रिल २०२५ पर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यातील उर्वरित पशुगणना मुदतीच्या आत पूर्ण करावी लागणार आहे.
जिल्ह्यात २० व्या पशुगणनेनुसार ७ लाख ७० हजार ६७९ कुटुंबांकडे १३ लाख ७ हजार ५७३ पशुधन तसेच १० लाख १७ हजार ४८७ कुक्कुट पक्षी होते तर २१ व्या पशुगणनेनुसार १० लाख १० हजार १७३ कुटुंबाकडे ११ लाख ५३ हजार ८६० पशुधन आणि ९ लाख ५ हजार १०९ कुक्कुट पक्षांची नोंद आहे. उर्वरित ५ तालुक्यांतील ३७ गावांमधील पशुगणनेचे काम या मुदतील पूर्ण करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभाग अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात १५०५ गावांपैकी मुक्ताईनगर ८०, बोदवड ५०, भडगाव ६३, धरणगाव ८८, चोपडा ११७, पारोळा ११६, पाचोरा १२८, अमळनेर १५३, रावेर ११७ आणि यावल ८९ अशा १४६८ गावांमधील पशुगणना पूर्ण झाली आहे. तर एरंडोल १, चाळीसगाव ४, भुसावळ आणि जळगाव प्रत्येकी ८ तर जामनेर तालुक्यातील १६ अशा पाच तालुक्यांतील ३७ गावांमध्ये पशुगणना लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
१५०५ पैकी १४६८ गावात ९६ टक्के पशुगणना पूर्ण
ग्रामीण व शहरी भागासाठी प्रगणक व पर्यवेक्षकांमार्फत ही गणना करण्यात येत असून जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५०५ गावांपैकी १ हजार ४६८ गावांतील सुमारे ११ लाख पशुधनाची नोंद मोबाईल ऍपद्वारे पूर्ण झाली आहे.
जिल्ह्यात जामनेर तालुक्यात १४१ गावांमध्ये ८५ टक्के पशुगणना झाली असून १६ गावांमधील पशुधनगणना केली जात आहे. भुसावळ तालुक्यात ४३ गावांमध्ये ८५ टक्के, तर जळगाव तालुक्यात १०५ गावांमध्ये ७९ टक्के पशुगणना पूर्ण झाली आहे. भुसावळ आणि जळगाव या दोन्ही तालुक्यात उर्वरित प्रत्येकी ८ गावांमध्ये पशुगणना केली जात असून एप्रिलच्या पहिल्या सप्ताहातच पशुगणना पूर्ण करण्यात येणार आहे.
डॉ. प्रदीप झोड,
-उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, जळगाव.